शालेय पतसंस्था पुन्हा ‘सहकार’कडे

By Admin | Updated: July 21, 2015 01:56 IST2015-07-21T01:56:53+5:302015-07-21T01:56:53+5:30

शालेय कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी पतसंस्था असलेल्या यवतमाळ जिल्हा शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या

School Credit Again Against Cooperation | शालेय पतसंस्था पुन्हा ‘सहकार’कडे

शालेय पतसंस्था पुन्हा ‘सहकार’कडे

हॅट्रिक : सर्व १५ ही जागा जिंकल्या, जिल्ह्यातील मोठी संस्था
यवतमाळ : शालेय कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी पतसंस्था असलेल्या यवतमाळ जिल्हा शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व १५ ही जागा सहकार पॅनलने मोठ्या मताधिक्याने जिंकल्या. दहा वर्षांपासून या पतसंस्थेत सत्ताधारी असलेल्या सहकार पॅनलने या निवडणुकीतील विजयाने विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे.
या पतसंस्थेच्या संचालक मंडळासाठी रविवारी निवडणूक झाली. सोमवारी मतमोजणी होवून निकाल जाहीर करण्यात आला. सत्ताधारी सहकार पॅनलविरुद्ध शिक्षक आघाडी पुरस्कृत परिवर्तन पॅनल असा सामना झाला. सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांचे १३ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून फेटाळण्यात आल्याने पतसंस्थेची निवडणूक चर्चेत आली होती. परंतु जिल्हा उपनिबंधकांनी हे सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरविले. त्याचप्रमाणे जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय उच्च न्यायालयानेही कायम ठेवल्याने निवडणूक रविवारी झाली.
सहकार पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये निरज भानुदास डफळे (१४५२), गणेश विठोबाजी म्हातारमारे (१३९९), शंकर श्यामरावजी भगत (१४०६), अशोक आनंदराव पोले (१४१६), राजेश केशवराव पुरी (१३९५), कोमलचंद सुगनचंद नाहार (१२९१), प्रमोद महादेवराव भेंडे (१३७३), विठ्ठल भगवंतराव परांडे (१३०५), संजय गुलाब भोयर (१३९४), भारत लटारी गारघाटे (१३९९), श्रीकांत मधुकर बोरकर (१५५९), गुलाब देवराव चव्हाण (१५१५), ज्ञानेश्वर भाऊरावजी गायकवाड (१४७७), मोहिनी सुधीरराव बक्षी (१४८१) आणि शुभांगी सुनील चोपने (१४४४) यांचा समावेश आहे.
उमेदवारांच्या विजयाची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला. (वार्ताहर)

राजेश पुरींचा चौथा विजय
पतसंस्थेच्या सचिवपदाची यशस्वी धुरा सांभाळणारे राजेश पुरी यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळविला आहे. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर याहीवेळी मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे. उमरखेड मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली.

आमदार समर्थित पॅनलचा दारूण पराभव
संपूर्ण जिल्हा कार्यक्षेत्र असलेली ही पतसंस्था ताब्यात मिळविण्यासाठी परिवर्तन पॅनलनेही सर्व शक्ती पणाला लावली होती. हे पॅनल अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे समर्थित शिक्षक आघाडी पुरस्कृत होते. या पॅनलने सहकारच्या उणीवा दाखवित, सत्ताधाऱ्यांची उणीदुणी काढत विविध आरोप केले. मात्र त्यांना यात यश आले नाही. दारूण पराभवाचा सामना त्यांना करावा लागला. विशेष म्हणजे, या पॅनलमधील एका उमेदवाराला पराभवाच्या हॅट्ट्रिकला तोंड द्यावे लागले. या पॅनलचा पराभव म्हणजे शिक्षक आघाडीला चांगलीच चपराक मानली जात आहे. सहकार पॅनलने नियोजनबद्ध केलेला प्रचार त्यांच्या विजयाचे गुपित मानले जाते.

Web Title: School Credit Again Against Cooperation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.