सोशल मीडियावर शिष्यवृत्तीचा बनावट मॅसेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:19 IST2018-06-04T22:18:44+5:302018-06-04T22:19:00+5:30
दहावीत ५० टक्के गुण मिळाल्याबरोबर ११ हजारांची आणि बारावीत ६० टक्के गुण मिळाल्याबरोबर २० हजारांची शिष्यवृत्ती मिळते, त्यासाठी नगरपालिकेत जाऊन अर्ज भरा... असा बनावट मेसेज सध्या सोशन मीडियात व्हायरल झाला आहे. या अफवेने यवतमाळ नगरपालिका प्रशासनाची मात्र चांगलीच भंबेरी उडत आहे.

सोशल मीडियावर शिष्यवृत्तीचा बनावट मॅसेज
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दहावीत ५० टक्के गुण मिळाल्याबरोबर ११ हजारांची आणि बारावीत ६० टक्के गुण मिळाल्याबरोबर २० हजारांची शिष्यवृत्ती मिळते, त्यासाठी नगरपालिकेत जाऊन अर्ज भरा... असा बनावट मेसेज सध्या सोशन मीडियात व्हायरल झाला आहे. या अफवेने यवतमाळ नगरपालिका प्रशासनाची मात्र चांगलीच भंबेरी उडत आहे. पालिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना समजावता-समजावता नाकीनऊ येत आहे.
नुकताच राज्य मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. तत्पूर्वी सीबीएसईचा दहावीचा आणि बारावीचाही निकाल लागला आहे. तीच संधी साधून व्हॉट्सअपवर विद्यार्थ्यांना आमिष दाखविणारा बनावट मेसेज फिरविला जात आहे. प्रत्यक्षात अशी कुठलीही शिष्यवृत्ती योजना अस्तित्वात नाही.
परंतु, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाची शिष्यवृत्ती योजना असल्याची अफवा व्हॉट्सअपवर पसरत आहे. विशेष म्हणजे, ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी नगरपालिकेतून अर्ज भरावा लागेल, असे सांगितले जात असल्याने शहरातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक दररोज नगरपालिकेत चकरा मारत आहेत. दररोज १०-१५ पालक पालिकेत येऊन अर्ज मागतात. कर्मचारी त्यांना अशी शिष्यवृत्तीच नसल्याचे समजावून सांगतात. मात्र हे पालक आपल्या नगरसेवकांना घेऊन येतात. त्यामुळे अखेर यवतमाळ नगरपालिकेला त्यासंदर्भात फलक लावावे लागले. प्रत्यक्षात कुठल्याही शिष्यवृत्तीचे अर्ज शाळास्तरावरूनच भरावे लागतात. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. निकाल लागताच हा मेसेज व्हायरल केला जातो. मात्र, पालकांनी त्यातील फोलपणा समजून घ्यावा, असे आवाहन पालिकेचे प्रशासन अधिकारी योगेश डाफ यांनी केले.
हाच तो बनावट संदेश
‘दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांच्या पालकांना विशेष माहिती कळविण्यात येते की, शासनाने मा. अब्दुल कलाम आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने यांच्या नावाने नवीन शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. ज्या मुलांनी दहावीमध्ये ५० टक्के मार्क मिळविले, त्यांना ११ हजार रुपये आणि ज्यांनी बारावीत ६० टक्के मार्क मिळविले, त्यांना २० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळविता येईल. त्यासाठी लागणारे फॉर्म व माहिती आपल्या जवळील महानगरपालिका, नगरपालिकेत मिळेल.’ हाच तो बनावट संदेश आहे. दहावी, बारावीचे निकाल लागताच तो व्हायरल झाला आहे.