तूर विक्रीसाठी ससेहोलपट
By Admin | Updated: March 3, 2017 02:01 IST2017-03-03T02:01:37+5:302017-03-03T02:01:37+5:30
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरू आहे. यावर्षी जादा क्षेत्रात लागवड झाल्याने तुरीचे उत्पादन तब्बल

तूर विक्रीसाठी ससेहोलपट
केंद्र बंद : यंदा १० लाख क्विंटलची वाढ होण्याची अपेक्षा
यवतमाळ : तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरू आहे. यावर्षी जादा क्षेत्रात लागवड झाल्याने तुरीचे उत्पादन तब्बल १० लाख क्विंटलने वाढण्याचे संकेत आहे. नेमकी हीच बाब हेरून व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात तुरीचे भाव पाडले आहे.
यावर्षी तब्बल ६८ हजार हेक्टवर तुरीचा जादा पेरा झाला. मागीलवर्षी जिल्ह्यात एक लाख १९ हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली होती. यावर्षी ६८ हजार हेक्टरने हे क्षेत्र वाढून एक लाख ८७ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला. वाढीव लागवडीमुळे यावर्षी उत्पन्नातही तब्बल १० लाख क्विंटलची वाढ होण्याचे संकेत आहे. मागीलवर्षी केवळ पाच लाख क्विंटल तुरीचे उत्पादन झाले होते. ते यावर्षी १५ लाख क्विंटल होण्याची अपेक्षा आहे. तुरीचे उत्पादन वाढण्याच्या शक्यतेने व्यापाऱ्यांनी दर पाडले आहेत. खुल्या बाजारात तुरीचे दर पडल्याने शासनाने हमी दरात तूर खरेदीसाठी जिल्ह्यात १६ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केले. खुल्या बाजारात केवळ ३२०० ते ३५०० रूपये प्रती क्विंटलचे दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रांकडे धाव घेतली. त्यामुळे तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. आता काही केंद्रांत बारदाना उपलब्ध नसल्याने सध्या बाभूळगाव, कळंब, आर्णी, राळेगाव आणि घाटंजी येथील खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)
बारदाणा, जागा नसल्याने खरेदी थांबली
अनेक केंद्रांवर सध्या बारदाना उपलब्ध नाही. काही ठिकाणी तूर साठविण्यासाठी गोदामात जागा नाही. त्यामुळे तूर खरेदी थांबली आहे. तथापि येत्या दोन दिवसांत सर्व केंद्रांवर बारदाना उपलब्ध होईल, अशी हमी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच तूर ठेवण्यासाठी अतिरिक्त गोदामांना मंजुरी मागण्यात आली असून या गोदामांत ४० हजार क्विंटल तूर साठवून ठेवता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र जिल्ह्यातील शेतकरी अद्याप भीतीच्या सावटात वावरत आहे.