चारही तालुक्यात संततधार
By Admin | Updated: September 8, 2014 01:48 IST2014-09-08T01:48:22+5:302014-09-08T01:48:22+5:30
वणीसह मारेगाव, झरीजामणी आणि पांढरकवडा तालुक्यात गेल्या २४ तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे.

चारही तालुक्यात संततधार
वणी : वणीसह मारेगाव, झरीजामणी आणि पांढरकवडा तालुक्यात गेल्या २४ तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने या चारही तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा, पैनगंगा, खुनी, निर्गुडा नद्यांना पूर आला आहे. याशिवाय नवरगाव आणि सायखेडा धरण ओव्हर फ्लो झाले आहे.
वणी, मारेगाव, झरीजामणी आणि पांढरकवडा तालुक्यात गेलया २४ तासांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास या पावसाला सुरूवात झाली. सुरुवातीला जोर नसलेल्या पावसाने सायंकाळपासून चांगलाच जोर पकडला. त्यानंतर रात्रभर सतत पाऊस कोसळत होता. आज रविवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोर पकडला. या पावसामुळे वणी तालुक्याच्या सीमेवरून वाहणारी वर्धा नदी चांगलीच फुगली आहे. सोबतच शहराची जीवनदायीनी असलेली निर्गुडा नदीही दुथडी भरून वाहात आहे. वर्धा नदीसोबतच निर्गुडा नदीला पूर आल्याने सोमवारी गणेश विसर्जन करताना काळजी घ्यावी लागणार आहे.
मारेगाव तालुक्यातील नवरगाव मध्यम प्रकल्प संततधार पावसाने तुडूंब भरला आहे. हा प्रकल्प सध्या ओव्हर फ्लो झाला आहे. त्यामुळे निर्गुडा नदीलाही पूर आला आहे. मारेगाव तालुक्यातील इतर सर्व नालेही पावसाने तुडूंब भरले आहेत. झरीजामणी तालुक्यातही हिच स्थिती आहे. तालुक्यातील सर्व छोटे-मोठे नाले दुथडी भरून वाहात आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे रविवारी ग्रामस्थांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. शेतकऱ्यांना शेतात जाणेही जमले नाही.
पांढरकवडा तालुक्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदीही दुथडी भरून वाहात आहे. या नदीला पूर आला आहे. संततधार पावसाने शनिवारी सायंकाळपासूनच नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढू लागला होता. याशिवाय खुनी नदीलाही पूर आला आहे. ही नदी दुथडी भरून वाहात आहे. त्यामुळे वाहतूक प्रभावीत झाली आहे. याशिवाय तालुक्यातील सायखेडा धरण ओव्हर फ्लो झाले आहे. या धरणातून अतिरिक्त पाण्याचा प्रवाह वाहात आहे.
वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा या चारही तालुक्यात रविवारी पावसाने कहर केला. संततधार पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले. वाहतुकीवरही त्याचा विपरीत परिणाम पडला. महामंडळाच्या अनेक बस विलंबाने सुटल्या. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली होती. अनेक प्रवासी बसस्थानकातच अडकून पडले होते. पाऊस थांबत नसल्याने अनेकांना परत जाणेही अशक्य झाले होते. त्यामुळे त्यांची त्रेधातिरपीट उडाली होती.
संततधार पावसाने या चारही तालुक्यातील पाण्याची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे. सुरूवातीला दडी मारलेल्या पावसाने पोळ्यापासून दमदार पुनरागमन केले होते. सतत चार दिवस पाऊस पडत होता. त्यानंतर जवळपास तीन ते चार दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा शनिवारपासून संततधार पावसाला सुरूवात झाली. रविवारी दिवसभर पाऊस कोसळत होता. त्याचा परिणामी जनीजीवनावर झाला. मात्र सुटीचा दिवस असल्याने बच्चे कंपनी व कर्मचाऱ्यांना पावसापासून दिलासा मिळाला. (कार्यालय प्रतिनिधी)