जिल्ह्यात संततधार
By Admin | Updated: July 11, 2016 02:12 IST2016-07-11T02:12:51+5:302016-07-11T02:12:51+5:30
गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जिल्ह्यात संततधार
सतर्कतेचा इशारा : जिल्ह्यात सोमवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार
यवतमाळ : गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील नदी तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून निम्न वर्धा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहे. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारा निळोणा प्रकल्प तुडुंब भरला असून कोणत्याही क्षणी ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात शुक्रवारपासून संततधार पावसाला प्रारंभ झाला. गत ४८ तासात पावसाने क्षणाचीही उसंत घेतली नाही. धो-धो बरसणाऱ्या या पावसाने नदी-नाल्यांना पूर आला आहे. गत २४ तासात जिल्ह्यात सरासरी २५ मिमी पाऊस कोसळला असून आतापर्यंत मासिक सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस महागाव तालुक्यात ४२ मिमी झाला असून यवतमाळ १३.२, बाभूळगाव ७, कळंब ६, आर्णी २०, दारव्हा ६, दिग्रस १६, नेर १३, पुसद ३७, उमरखेड ३२, केळापूर २७, राळेगाव ९, घाटंजी ४०, वणी ४१, मारेगाव २६, झरी ५१ मिमी पाऊस कोसळला. जिल्ह्यात आतापर्यंत ३५८ मिमी पाऊस कोसळल्याची नोंद करण्यात आली आहे. पैनगंगा, वर्धा यासह जिल्ह्यातील इतर नद्या दुथडी भरत वाहत असून नाल्यांना आलेल्या पुरामुळे पुसद-उमरखेड मार्ग दहागावजवळ असलेल्या नाल्याला आलेल्या पुराने ठप्प झाला होता. सायंकाळपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक बंद होती. तर पुसद-महागाव हा रस्ता गुंज नाल्याला आलेल्या पुराने ठप्प झाला आहे. तसेच महागाव-करंजखेड येथे नाल्याच्या पुलावरही पाणी वाहत होते. पुसद तालुक्यातील बेलोरा खुर्द ते बेलोरा या मार्गावरील नाल्याचे पाणी पुलावरून वाहत होते. पैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने नदी तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्ष नजर ठेऊन आहे. तहसीलदार आणि गावातील संबंधितांना सूचना दिल्या आहेत.
यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्प तुडुंब भरला असून कोणत्याही क्षणी ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे. प्रकल्पात एक हजार २७३ फूट जलसाठा निर्माण झाला आहे. प्रकल्प ओव्हर फ्लो होण्यासाठी एक फूट पाण्याची आवश्यकता आहे. हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने यवतमाळकरांना दिलासा मिळणार असून आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा केला जाईल. लवकरच सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.