सोनखास हेटी येथे ४० वर्षांपासून भीषण पाणीटंचाईच्या झळा
By Admin | Updated: April 2, 2016 03:02 IST2016-04-02T03:02:25+5:302016-04-02T03:02:25+5:30
गेल्या ४० वर्षांपासून सोनखास व हेटी ग्रामस्थ पाणीटंचाईचा सामना करीत आहे. वर्षातील आठ महिने तर भीषण स्थिती असते.

सोनखास हेटी येथे ४० वर्षांपासून भीषण पाणीटंचाईच्या झळा
शासकीय यंत्रणा झोपेत : सततच्या पाठपुराव्यानंतरही दुर्लक्ष
सोनखास : गेल्या ४० वर्षांपासून सोनखास व हेटी ग्रामस्थ पाणीटंचाईचा सामना करीत आहे. वर्षातील आठ महिने तर भीषण स्थिती असते. मात्र टंचाई निवारणाकरिता सतत पाठपुरावा करूनही शासकीय यंत्रणेला घाम फुटला नाही. पाणीटंचाईने सोनखास हेटीवासीयांच्या डोळ्यात अश्रू येत असून आता तरी यंत्रणेला जाग येईल का, असा प्रश्न विचारला जात आहे.
नेर तालुक्यातील सोनखास हेटी ही साधारणत: दीड ते दोन हजार लोकसंख्या वस्तीची गटग्रामपंचायत आहे. या दोन्ही गावात गेल्या ४० वर्षांपासून भीषण पाणीटंचाई आहे. या बाबतीत दरवर्षी गावकरी प्रशासनाला साकडे घालून पाणी समस्या सोडविण्याची मागणी करतात. मात्र हाकेला साद देईल ती शासकीय यंत्रणा कसली? सोनखासवासीयांना शासकीय यंत्रणेच्या कामचलावू धोरणाचा फटका बसत आहे. ग्रामस्थांनी अनेकदा आमदार, मंत्री, अधिकारी यांना निवेदने दिली. पण कुणीही या गावकऱ्यांच्या मदतीला धावले नाही. इकडे भीषण पाणीटंचाईने गावातील पुरुष-महिला, आबालवृद्धांचा जीव मेटाकुटीस आला आहे. सर्व कामे सोडून आधी पाणी साठवणूक करण्याकरिता जीवाचा आटापिटा करीत आहे. शासनाने गेल्या दोन वर्षांपासून जलयुक्त शिवारची कामे सुरू केली आहे. परंतु सोनखास येथे मात्र भीषण पाणीटंचाई असताना त्यासाठी काहीच प्रयत्न केल्या जात नाही. परिसरातील जलयुक्त शिवारची कामे, पाणलोट विकासच्या कामाचा दर्जा तपासल्यास सदर योजना पुढाऱ्यांना जगविण्यासाठीच शासनाने निर्माण केल्या का, असे वाटू लागते. पाणीटंचाई निवारणार्थ शासनाने शाश्वत उपाययोजना करण्याची गरज असून याकरिता प्रामाणिक प्रयत्न करण्याची मागणी सोनखास हेटीवासीयांनी केली आहे. (वार्ताहर)