पोलिसांच्या कारभारावर संघ-भाजपा नाराज

By Admin | Updated: October 14, 2016 03:03 IST2016-10-14T03:03:48+5:302016-10-14T03:03:48+5:30

उमरखेड येथील गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा परिवारामध्ये जिल्हा पोलीस

Sangh-BJP angry over the police regime | पोलिसांच्या कारभारावर संघ-भाजपा नाराज

पोलिसांच्या कारभारावर संघ-भाजपा नाराज

बदलीची चर्चा : नागपुरातील दोन उपायुक्तांची नावे आघाडीवर
यवतमाळ : उमरखेड येथील गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा परिवारामध्ये जिल्हा पोलीस प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातूनच पोलीस प्रशासनात ‘चेंज’ची मागणी ‘सीएमओ’पर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. ‘सीएमओ’ने ही मागणी गांभीर्याने घेतल्याचेही बोलले जाते.
पोलीस प्रशासनाच्या कारभाराविरोधात धुसफूस सुरू असताना उमरखेड येथील गणेश विसर्जन मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेने आयतेच कोलीत या नाराज संघ-भाजप परिवाराच्या हाती लागले. राज्यात सर्वत्र गणेशोत्सव शांततेत पार पडला असताना केवळ उमरखेडमध्येच दंगल कशी घडली, असा सवाल विचारला जात आहे. या प्रकरणात अटक झालेल्या चेहऱ्यांवर संघ-भाजपाचे समाधान झालेले नाही. कदाचित त्यांना सोयीने अटक हवी असावी. त्यातूनच पोलीस प्रशासनावर संघ-भाजपाची नाराजी ओढवली. या नाराजीला काही लोकप्रतिनिधींनीही ‘ओ’ देवून ‘सीएमओ’पर्यंत आवाज गुंजविल्याने पोलीस प्रशासनातील ‘चेंज’चा नारा आणखी बुलंद झाल्याचे सांगण्यात येते. यातूनच आठवडाभरात पोलीस प्रशासनात ‘चेंज’ होणार असल्याची चर्चा सत्ताधारी युतीच्या कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळते आहे. या चर्चेचे लोण पोलीस यंत्रणेतही पोहोचले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ऊर्जा राज्यमंत्री या ‘चेंज’ला खरोखरच किती प्रतिसाद देतात, यावर जिल्हा पोलीस प्रशासनातील फेरबदल अवलंबून असल्याचे सांगितले जाते.
जिल्ह्यात नेर, घाटंजी, उमरखेड, आर्णी, लोहारा, वणी अशा काही ठाणेदारांच्या बदलाचीही चर्चा आहे. नेर ठाणेदाराची वाटचाल तीन वर्षांच्या कार्यकाळाकडे होत असल्याने त्यांना सोयीने आधीच उचलून घाटंजीत बसविले जाणार असल्याचे समजते. उमरखेडला नव्यानेच गेलेल्या ठाणेदाराची गणेशोत्सवातील दगडफेकीमुळे उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. कदाचित दुर्गोत्सवानंतर हा ‘चेंज’ होईल. वणी ठाणेदाराला तेथे जाण्याची सक्ती करून बाहेरून येणाऱ्या अनुभवी ठाणेदारासाठी वणीची खुर्ची रिकामी करण्याचा प्रयत्न होतो आहे. मात्र वणी ठाणेदाराने ‘मला जेमतेम वर्ष झाले’, असे सांगून नकार दिल्याने प्रशासनापुढील अडचणी वाढल्या आहे. अन्य ठाण्यांसाठी काहींनी मोर्चेबांधणी चालविली असली तरी त्यांना ‘राजकीय मार्गाने’ येण्याचा सल्ला दिला जात असल्याने प्रशासनाप्रती नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. बदलीच्या यादीत असलेल्या ठाणेदारांनी मात्र राजकीय वजन वापरून आपला ‘चेंज’ रोखण्याचा प्रयत्न चालविला आहे. आर्णी ठाणेदाराच्या बदलीसाठी भाजपाचे लोकप्रतिनिधीच अधिक आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. एसपी कार्यालयात तैनात असलेले पोलीस अधिकारी जिल्ह्यातील ठाणेदारांच्या या ‘चेंज’ची चातकासारखी प्रतीक्षा करीत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

दोन उपायुक्तांच्या नावांची चर्चा
संघ-भाजपाच्या नाराजी आणि आग्रहावरून ‘सीएमओ’ने जिल्हा पोलीस प्रशासनात ‘चेंज’ केल्यास नवा चेहरा कोण? याचीही चर्चा पोलीस वर्तुळात होवू लागली आहे. सूत्रानुसार, अशा संभाव्य ‘चेंज’नंतर अनेक नावे चर्चेत आहे. त्यात नागपुरातील दोन पोलीस उपायुक्तांची नावे आघाडीवर आहे. शिवाय मपोसे ते भापोसे असा प्रवास करणाऱ्या आणखी एका अधिकाऱ्याच्या नावाचीही चर्चा आहे. वर्षभरापूर्वी त्यांची संधी हुकली होती. भाजप नेत्याच्या भरोशावर राहिल्याने त्यांना साईड ब्रँचला जावे लागले होते. यावेळी त्यांनी पुन्हा प्रयत्न चालविले आहे.

Web Title: Sangh-BJP angry over the police regime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.