लोहारातील सानेगुरुजीनगर पाण्यासाठी जागतोय
By Admin | Updated: April 2, 2016 02:59 IST2016-04-02T02:59:42+5:302016-04-02T02:59:42+5:30
लोहारा परिसरातील सानेगुरुजी नगर भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

लोहारातील सानेगुरुजीनगर पाण्यासाठी जागतोय
ग्रामपंचायतकडून दुर्लक्षित : नगरपरिषदेत विलीन होऊनही उपेक्षित
यवतमाळ : लोहारा परिसरातील सानेगुरुजी नगर भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मध्यमवर्गीयांच्या या वसाहतीकडे लक्ष देण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांसह प्रशासनालाही वेळ नसल्याचे दिसते.
लोहारा-वाघापूर बायपासच्या काठावर सानेगुरुजीनगर भाग एक आणि सानेगुरुजीनगर भाग दोन ही वसाहत वसली आहे. यातील सानेगुरुजीनगर भाग दोन परिसरात सार्वजनिक पाणीपुरवठ्याची कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. संबंधित ले-आऊटधारकाने बांधकामासाठी खोदलेल्या एका बोरवलचाच आता पिण्याच्या पाण्यासाठी वापर केला जात आहे. परंतु, एकाच बोरवेलद्वारे संपूर्ण वसाहतीसाठी पाणी पुरणे अशक्य होत आहे. उन्हाळ्यात तापमान वाढताच या बोरवेलची पाणीपातळीही खोल गेली आहे. त्यामुळे सानेगुरुजीनगरवासीयांचा हा एकमेव आधारही आता तुटला आहे. त्यामुळे पाण्याच्या एका-एका थेंबासाठी नागरिक मोताद झाले आहेत.
सानेगुरुजीनगर भाग दोन ही वसाहत गेल्या दोन वर्षांपूर्वी वसली. त्यावेळी अस्तित्वात असलेल्या लोहारा ग्रामपंचायतीच्या हद्दीत हा परिसर होता. येथील नवीन रहिवाशांनी ग्रामपंचायतीकडे घर करही भरला. मात्र, त्यांना सुविधा पुरविण्याकडे ग्रामपंचायतीने साफ दुर्लक्ष केले. अलिकडेच लोहारा ग्रामपंचायत यवतमाळ नगरपरिषदेत विलीन झाली. नगरपरिषदेने हा भाग ताब्यात घेताच सुविधा पुरविणे आवश्यक होते. परंतु मूलभूत सुविधा न देता कर वसुली सुरू केली आहे. या बाबत नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. साने गुरुजीनगरातील एकमेव बोअरवेल मोटारपंपामध्ये वारंवार बिघाड होत असल्याने नागरिकांची ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी तारांबळ उडत आहे. याकडे संबंधित ले-आऊटधारकांनीही दुर्लक्ष केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)