मंत्री घडविणारे पालिकेचे साने गुरुजी विद्यामंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 06:00 AM2020-03-09T06:00:00+5:302020-03-09T06:00:16+5:30

शाळेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही शाळा सकाळी ९.३० वाजताच सुरू होते. सुरुवातीला एक तास जादा वर्ग घेऊन स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करवून घेतली जाते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसोबत सर्व शिक्षकही एक तास आधीच हजर असतात. केवळ नगरपालिकेच्या अनुदानावर अवलंबून न राहता येथील शिक्षकांनी संस्कार कलश एकता ग्रुप, मुनोत ट्रस्ट, महाजन ट्रस्ट अशा संस्थांशी संवाद साधून लोकवर्गणी मिळवली.

Sane Guruji Vidyamandir of the Municipality to be a minister | मंत्री घडविणारे पालिकेचे साने गुरुजी विद्यामंदिर

मंत्री घडविणारे पालिकेचे साने गुरुजी विद्यामंदिर

Next
ठळक मुद्देयवतमाळ पालिकेची आगळीवेगळी शाळा : गरीब पालकांच्या लेकरासाठी नर्सरीपासूनच शिक्षणाचा श्रीगणेशा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खासगी शाळांच्या वावटळीत नगरपालिकेच्या शाळा पार कोलमडून गेल्या आहेत. मात्र या तुफानातही यवतमाळ नगरपालिकेची शाळा क्र. ७ नुसती टिकलीच नाही तर बहरली आहे. साने गुरूजी विद्यामंदिर म्हणून नावारूपास आलेल्या या शाळेत शिकून पालकमंत्री संजय राठोड, माजी पालकमंत्री तथा आमदार मदन येरावार यांच्या नेतृत्वगुणांचा विकास झाला, हे विशेष !
गोरगरिबांची मुले या शाळेत शिकतात. अशा मुलांना खासगी शाळांमध्ये जावून नर्सरीचे शिक्षण घेणे शक्य नाही. हा विचार करून साने गुरूजी विद्यामंदिरात नर्सरी, केजी-१, केजी-२ सुरू करण्यात आले असून तेथे सध्या ४२ विद्यार्थी लाभ घेत आहे. शाळेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही शाळा सकाळी ९.३० वाजताच सुरू होते. सुरुवातीला एक तास जादा वर्ग घेऊन स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करवून घेतली जाते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसोबत सर्व शिक्षकही एक तास आधीच हजर असतात. केवळ नगरपालिकेच्या अनुदानावर अवलंबून न राहता येथील शिक्षकांनी संस्कार कलश एकता ग्रुप, मुनोत ट्रस्ट, महाजन ट्रस्ट अशा संस्थांशी संवाद साधून लोकवर्गणी मिळवली. त्यातून शाळेची रंगरंगोटी, आवारातील महाकाय वटवृक्षाला देखणा ओटा, पाण्यासाठी विंधन विहीर, डिजीटल साहित्य, हँडवॉश स्टेशन, जलशुद्धीकरण यंत्र अशा सुविधा करून घेतल्या. खासगी शाळेत मिळणाऱ्या जवळपास सर्वच भौतिक सुविधा या शाळेत गरिबांच्या विद्यार्थ्यांच्या मिळवून देण्यात शिक्षकांना यश मिळाले आहे.

९९ टक्के हजेरी, परसबाग
साने गुरूजी विद्यामंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे दररोज १०० टक्के उपस्थिती असते. आजारी असला तरच एखादा विद्यार्थी गैरहजर असतो. त्यामुळे ही हजेरी ९९ टक्के गणली जाते.

शाळेत मुलांनीच सुंदर परसबाग साकारली आहे. विशेष म्हणजे, दर शनिवारी ६.३० वाजता येऊन विद्यार्थीच या बागेची देखभाल करतात. गांडूळखत निर्मिती, पक्के गणित, बाल महोत्सव, पालक सभा, परिपाठ आणि हिरवागार परिसर यामुळे विद्यार्थी शाळेला आपले घरच समजतात.

या शाळेला मी माझे तिसरे अपत्य मानले आहे. विद्यार्थ्यांचे ७० गणवेश माझ्या पत्नीने मोफत शिवून दिले. त्यासोबतच सत्यम शेंबाडे, आराधना बेनकर, लक्ष्मीकांत कांबळे, मंजिरी सहस्त्रबुद्धे, स्वप्नील सोनोने या शिक्षकांची सक्रिय साथ लाभत आहे. केंद्र प्रमुख राजेंद्र मेनकुदळे, प्रशासन अधिकारी योगेश डाफ यांच्या मार्गदर्शनाने शाळा प्रगती करीत आहे.
- पंतीलाल साबळे, मुख्याध्यापक

मराठी शाळा जीवित राहाव्या, यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न आहे. म्हणूनच नगरपालिकेच्या शाळांना आम्ही स्वत: व इतर संस्थांच्या माध्यमातून लाखोंची वर्गणी गोळा करून दिली. आता इतरही क्लब पुढे येत आहे. ही शाळा गरीब मुलांना उत्तम शिक्षण देत आहे.
- कीर्ती पद्मावार, अध्यक्ष संस्कार कलश एकता ग्रुप

विद्यार्थ्यांसाठी ऑटोरिक्षा
खासगी शाळांप्रमाणे पालिकेच्या या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी स्वखर्चाने चार ऑटोरिक्षा लावले आहे. शाळेपासून अत्यंत दूर असलेल्या गोधनी परिसरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खास सुविधा करण्यात आली आहे.

Web Title: Sane Guruji Vidyamandir of the Municipality to be a minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा