भेसळयुक्त खाद्य तेलाची विक्री
By Admin | Updated: April 12, 2017 00:10 IST2017-04-12T00:10:19+5:302017-04-12T00:10:19+5:30
गेल्या काही महिन्यांपासून उमरखेड तालुक्यात भेसळयुक्त खाद्य तेलाची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खाद्यपदार्थात भेसळ वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

भेसळयुक्त खाद्य तेलाची विक्री
उमरखेडकरांचे आरोग्य धोक्यात : अन्न प्रशासन विभाग केवळ नावालाच
उमरखेड : गेल्या काही महिन्यांपासून उमरखेड तालुक्यात भेसळयुक्त खाद्य तेलाची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खाद्यपदार्थात भेसळ वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे अन्न औषधी प्रशासन मात्र लक्ष देण्यास तयार नाही. गेल्या काही वर्षात एकदाही या विभागाने या परिसरात अचानक कारवाई करून नमुने प्रयोगशाळेत पाठविले नाही, त्यामुळे अन्न व औषधी प्रशासन केवळ नावालाच असल्याचे दिसून येते.
तालुक्यात ठोक व्यापाऱ्यांपासून किरकोळ दुकानदारांपर्यंत भेसळयुक्त खुले खाद्यतेल विकले जात आहे. तालुक्यात नांदेड, आदिलाबाद तसेच इतर काही शहरांमधून तेलाचे टँकर व टाक्या आणल्या जातात. हे टँकर उमरखेड शहरासह तालुक्यातील ढाणकी, बिटरगाव, विडूळ, ब्राह्मणगाव, चातारी, मुळावा, पोफाळी आदी गावांमधील व्यापाऱ्यांना आपला माल विकतात आणि त्यानंतर लोखंडी डब्यात तेल भरून एखाद्या कंपनीचे लेबल लावून तेलाची विक्री केली जाते. हा सर्व व्यवहार खुलेआम सुरू आहे. परंतु याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागतात. तसेच याबाबतचे कोणतेही पक्के बिल देण्यात येत नसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे.
आपले चांगभले करून घेण्यासाठी काही व्यापाऱ्यांकडून अशा प्रकारचा धंदा सुरू आहे. गोरगरीबांना महिन्याकाठी १५ लिटर तेलाचा डबा नेणे परवडत नाही. त्यामुळे उमरखेड तालुक्यातील विविध गावांत व शहरातील वस्त्यांमध्ये किराणा दुकानातून खुल्या तेलाच्या स्वरूपात या खाद्यतेलाची विक्री करण्यात येते. २०११ च्या जनगणनेनुसार उमरखेड तालुक्याची लोकसंख्या दोन लाख ६० हजार असून सद्यस्थितीत ती चांगलीच वाढत आहे. यातील केवळ बोटावर मोजण्याइतपत नागरिक सोडल्यास बहुतांश नागरिक हेच तेल वापरत आहे. त्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या विभागात येणाऱ्या महागाव, काळी दौ., फुलसावंगी, मुडाणा, सवना, गुंज, हिवरा यासह ढाणकी, मुळावा, विडूळ, पोफाळी, ब्राह्मणगाव आदी भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खुले तेल विक्री केल्या जात आहे. अशा लोकांवर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
(शहर प्रतिनिधी)
मोठे मासे पकडणे गरजेचे
खाद्य तेलामध्ये भेसळीचे मोठे नेटवर्क आहे. छोट्या दुकानदारांकडून केवळ माल विक्री केल्या जातो. त्यामुळे या भेसळीच्या मुळावर म्हणजे मोठ्या मास्यांवर घाव घालणे गरजेचे आहे. अन्न व औषधी प्रश्नासनाचा निष्क्रियपणा याला कारणीभूत आहे. कधीही कोणतीही कारवाई होत नाही, झाल्यास अर्थपूर्ण सबंधातून दडपली जाते, त्यामुळे अशा भेसळखोरांचे चांगलेच फावत आहे. याबाबत तक्रारी करूनही दखल मात्र घेतली जात नाही.