किशोर वंजारी - नेरआर्थिक परिस्थितीपुढे हतबल झालेल्या एका पित्याने उधारीच्या पैशाच्या मोबदल्यात चक्क आपल्या १४ वर्षीय मुलालाच मेंढपाळाकडे तारण म्हणून कामाला पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हे प्रकरण पोलिसात पोहोचले असून कारवाईसाठी पोलीस तक्रारीच्या प्रतीक्षेत आहे. नेर तालुक्यातील पिंपळगाव (डुब्बा) येथे एक मेंढपाळ राहतो. तो काही दिवसांपूर्वी धारणी तालुक्यातील दाबका येथे आपल्या नातेवाईकाकडे गेला होता. तेथे एक गरीब इसम त्याला भेटला. त्याने आपली आर्थिक अडचण सांगून उधारीवर पैशाची मागणी केली. त्यानुसार सदर मेंढपाळाने त्याला पैसे दिले. या पैशाची परतफेड करता यावी म्हणून त्या व्यक्तीने आपल्या १४ वर्षीय महादेव नामक मुलाला अडीच हजार रुपये दरमहा मजुरीवर सदर मेंढपाळाकडे कामासाठी पाठविले. दरम्यान मंगळवारी सायंकाळी महादेव नेर तालुक्यातील वटफळी-पिपरी-मुखत्यारपूर परिसरात अनवाणी पायाने फिरताना आढळून आला. त्याच्या अंगावर कपडा नव्हता. तो सारखा रडत होता. परिसरातील शेतकऱ्यांनी त्याची विचारपूस केली असता ‘कर्जाच्या मोबदल्यात तारण’ हा प्रकार पुढे आला. तीन दिवसांपूर्वी मालकाच्या मेंढ्या चारत असताना एका मेंढीच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे मेंढपाळ त्याच्यावर रागावला. मालक आता आपल्याला मारेल या भीतीने सदर बालक शेतशिवारात एकटाच फिरत होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी महादेवला धनज येथील पोलीस पाटलाकडे आणले. त्यांनी त्याला नेर पोलीस ठाण्यात हजर केले. पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेथे अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातून आपण मेंढपाळाकडे कामासाठी आल्याचे त्याने सांगितले. त्याने आपले अपहरण झाल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र आर्थिक व्यवहार उघड झाल्याने या कथित अपहरण नाट्यावर पडदा पडला. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केला नाही. या घटनेने मात्र आदिवासी बहुल मेळघाटातील शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक परिस्थिती आणि त्यातून निर्माण होणारी हतबलता उघड झाली आहे.
उधारीच्या मोबदल्यात मुलगा मेंढपाळाकडे !
By admin | Updated: December 24, 2014 23:06 IST