सॅल्यूट केला नाही म्हणून महिला शिपायाची बदली
By Admin | Updated: October 29, 2015 02:51 IST2015-10-29T02:51:09+5:302015-10-29T02:51:09+5:30
शहरात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यामध्ये पोलिसांची चांगलीच कसरत होत आहे.

सॅल्यूट केला नाही म्हणून महिला शिपायाची बदली
साहेबांचा दुखावला इगो : वाढत्या गुन्हेगारीमुळे वरिष्ठही तणावात
यवतमाळ : शहरात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यामध्ये पोलिसांची चांगलीच कसरत होत आहे. याचा राग वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून इतरत्र निघत असल्याचे दिसून येते. अशातच सॅल्यूट मारला नाही, या कारणारून एका महिला वाहतूक शिपायाची बदली तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे प्रकरण सध्या पोलीस वर्तुळात चर्चिले जात आहे.
दुर्गादेवी, दसरा आणि आता दिवाळीचा बंदोबस्त, सोबत जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारीही त्रस्त झाल्याचे दिसून येते. त्यातच मंगळवारी येथील एका चौकात दोन महिला वाहतूक पोलीस आपल्या कर्तव्यावर होत्या. यावेळी तेथून एक वरिष्ट पोलीस अधिकारी त्या चौकातून दोन वेळा गेले. दोन्ही वेळेला या महिला पोलिसांनी साहेबांना ‘सॅल्यूट’ ठोकला. परंतु तिसऱ्यांदा साहेबांचे वाहन आले तेव्हा या महिला वाहतूक शिपाई एका वाहनावर कारवाई करण्यात व्यस्त असल्याने त्यांचे साहेबांच्या गाडीकडे लक्षच नाही.
या क्षुल्लक बाबींवरून साहेबांचा पारा मात्र चढला. कुठेतरी साहेबांचा ‘इगो’ दुखाविला गेला. लागलीच दोन्ही महिला शिपायांना बोलाविणे आले. साहेबांनी आपल्या कक्षात त्यांना चांगलेच सुनावले. मुकुटबनला बदली करावी लागते का, असा दमही दिला. या महिला शिपायांनी शक्य ती प्रामाणिक सफाई देण्याचा प्रयत्नही केला. परंतु कनिष्ट कर्मचाऱ्यांचे ऐकून घेतील, ते साहेब कसले. यापुढे लक्ष ठेवा, असे सांगून त्यांनी या महिला शिपायांना कक्षाबाहेर जाण्यास सांगितले. घाबरलेल्या अवस्थेत दोघीही बाहेर पडल्या. सायंकाळी तडकाफडकी त्यातील एकीच्या बदलीची प्रक्रिया सुरू झाल्याचे कळले. याबाबत अधिकृत सूत्रांशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला. परंतु आॅर्डर अद्याप अप्राप्त असल्याचे सांगितले. या बाबींवरून वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांचाही ताण किती वाढला आहे आणि त्याच्यात कुणाचा बळी जाईल, हे सांगता येत नाही. याची मात्र खमंग चर्चा रंगली होती. (प्रतिनिधी)