सागवान तस्कर अप्प्या अखेर मुलासह गजाआड
By Admin | Updated: June 5, 2016 02:16 IST2016-06-05T02:12:06+5:302016-06-05T02:16:31+5:30
कोट्यवधी रुपयांच्या सागवान तस्करीत सहभाग असलेला मात्र अनेक वर्षांपासून फरार असलेला तस्कर ‘अप्प्या’ याला त्याच्या आरोपी मुलासह पकडण्यात आले.

सागवान तस्कर अप्प्या अखेर मुलासह गजाआड
कोट्यवधींची वृक्षतोड : पुसद वनविभागाची कारवाई
पुसद : कोट्यवधी रुपयांच्या सागवान तस्करीत सहभाग असलेला मात्र अनेक वर्षांपासून फरार असलेला तस्कर ‘अप्प्या’ याला त्याच्या आरोपी मुलासह पकडण्यात आले. शेख इरफान ऊर्फ अप्प्या शेख रहेमान (५०) व शेख अस्लम शेख इरफान (३०) दोघेही रा. अमृतनगर (खंडाळा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
सदर दोघेही गेली १५ वर्षांपासून अवैध वृक्षतोड व सागवान तस्करीत सक्रिय आहेत. त्यांच्यावर विदर्भासह मराठवाड्यातही सागवान तस्करीचे गुन्हे दाखल आहे. विदर्भ-मराठवाडा व तेलंगानातील निजामाबादपर्यंत त्यांचे सागवान तस्करीचे नेटवर्क असल्याचे सांगितल्या जाते. एकट्या पुसद वनपरिक्षेत्रांतर्गत त्यांच्याविरुद्ध विविध गुन्ह्यांची नोंद आहे. खंडाळा जंगलातून त्यांनी मोठ्या प्रमाणात सागवान तोड केली आहे.
पुसद वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अप्प्याला यापूर्वी १९ मार्च रोजी अटक केली होती. त्याची जामिनावर सुटका झाली होती. मात्र त्याचा मुलगा शेख अस्लम हा अनेक वर्षांपासून फरार होता. शनिवार ४ जून रोजी स्थानिक छत्रपती शिवाजी चौकातील एक हॉटेलात दुपारी १२.४५ वाजता अप्प्या व त्याचा मुलगा शेख अस्लम हे दोघे बसून असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय खंडारे, वनपाल मनोहर पुंड, जयंतीलाल राठोड, वनरक्षक दिलीप ठाकरे, वाय.बी. गायकवाड, एस.एस. निथळे आदींनी सापळा रचून अप्प्या व त्याच्या मुलाला अटक केली.
(प्रतिनिधी)