प्रेयसीसाठी नव्हे, देशासाठी बलिदान द्या

By Admin | Updated: March 25, 2017 00:20 IST2017-03-25T00:20:40+5:302017-03-25T00:20:40+5:30

आजकालची तरूणाई वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्याआधीच एकमेकांच्या प्रेमात पडते. त्यातून आत्महत्येसारख्या अप्रिय घटनाही घडतात.

Sacrifice for the country, not for a loved one, but for a loved one | प्रेयसीसाठी नव्हे, देशासाठी बलिदान द्या

प्रेयसीसाठी नव्हे, देशासाठी बलिदान द्या

सत्यपाल महाराज : अडेगावात पार पडला प्रबोधन कार्यक्रम, १५ हजारांवर भाविक उपस्थित
वणी : आजकालची तरूणाई वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्याआधीच एकमेकांच्या प्रेमात पडते. त्यातून आत्महत्येसारख्या अप्रिय घटनाही घडतात. असे बलिदान काय कामाचे? प्रियकर, प्रेयसीसाठी बलिदान देण्यापेक्षा तरुण तरुणींनो देशासाठी बलिदान करा, असा उपदेश प्रख्यात सप्तखंजिरी वादक प्रबोधकार सत्यपाल महाराज यांनी गुरूवारी केले.
झरी तालुक्यातील अडेगाव येथे रक्तदान महादान फाऊंडेशन, मंगेश पाचभाई मित्र परिवार, हनुमान मंदिर पंचकमिटी व समस्त गुरूदेव सेवा मंडळाच्यावतीने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. मराठी नववर्ष व शहीद दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिरही पार पडले. यात ५० जणांनी रक्तदान केले.
पुढे बोलताना सत्यपाल महाराज म्हणाले, आंतरजातीय विवाहाला माझा विरोध नाही. असे विवाह झाले तर समाजातील जातीयतेची दरी दूर होऊन समाज एकसंघ बनेल. परंतु प्रेमालाही काही मर्यादा असाव्यात. आई-वडिल जन्म देतात. त्यांनाही आपल्या मुलांकडून काही अपेक्षा असतात. परंतु आजकालची तरूणाई शाळा शिकत असताना अल्पवयीन अवस्थेतच एकमेकांच्या प्रेमात पडतात. प्रेम म्हणजे काय हेदेखील त्यांना कळत नाही. प्रसंगी एकमेकांसाठी या प्रेमविरांनी आत्महत्याही केल्याच्या घटना या समाजात सातत्याने घडतात. आधी शिका, स्वत:ला सुसंस्कारात घडवा. त्यानंतर आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीशी लग्न करा, असा सल्ला त्यांनी तरूणाईला दिला.
या देशासाठी भगतसिंग, चंद्रशेखर, राजगुरू यांनी या देशासाठी प्राण त्यागले. या बलिदानाचा विसर पडू देऊ नका. आपण बलिदान कशासाठी करीत आहोत, याचे भान ठेवा. प्रेमप्रकरणातून आत्महत्या करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. व्यसन समाजाला पोखरून खात आहे. त्यामुळे व्यसनापासून कायम दूर रहा. असेही त्यांनी सांगितले. या प्रबोधनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील ३० ते ३५ गावांतील १५ हजारांपेक्षा अधिक भाविकांनी हजेरी लावली. कार्यक्रमाला डॉ.अशोक जीवतोडे, डॉ.प्रेमानंद लोढे, उदयपाल महाराज, राजेश नाईक, वन विभागाचे रत्नपारखी, हकीम हुसेन, सरपंच अरुण हिवरकर, आयोजक मंगेश पाचभाई प्रामुख्याने उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Sacrifice for the country, not for a loved one, but for a loved one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.