मुक्या जनावरांची निर्दयपणे वाहतूक
By Admin | Updated: September 6, 2015 02:25 IST2015-09-06T02:25:46+5:302015-09-06T02:25:46+5:30
बोलेरो पीकअप या चारचाकी मोठ्या वाहनातून एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १६ बैलांची पायांना दोरीने बांधून निदर्यीपणे वाहतूक सुरू होती.

मुक्या जनावरांची निर्दयपणे वाहतूक
१६ बैल : तिघांविरूद्ध झाला गुन्हा दाखल, चार लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
पांढरकवडा : बोलेरो पीकअप या चारचाकी मोठ्या वाहनातून एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १६ बैलांची पायांना दोरीने बांधून निदर्यीपणे वाहतूक सुरू होती. शनिवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास केळापूर मार्गावरील टोल नाक्याजवळ हे वाहन पोहोचताच पोलिसांनी या जनावरांची निर्दयी वाहतूक करणाऱ्या तिघांच्या मुसक्या अखेर आवळल्या.
पांढरकवडा शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात जातो. कन्याकुमारी ते विशाखापट्टनम जाणारा हा मार्ग रात्रभर वाहनांनी गजबजून जातो. याच मार्गावरून रात्री अंधाराचा लाभ घेत काही जण अत्यंत निर्दयीपणे मुक्या जनावरांची वाहतूकही करतात. या मार्गाने विदर्भातून आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात मुकी जनावरे नेली जातात. शनिवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास येथील पोलीस उपनिरीक्षक संतोष माने हे कर्मचाऱ्यांसह रात्र गस्तीवर होते. गस्त सुरू असताना त्यांना काही नागरिकांनी त्यांना या मागाने जनावरांची निर्दयी वाहतूक होत असल्याची माहित दिली.
माहिती मिळताच माने आणि पथक केळापूर टोल नाक्याजवळ पोहोचले. तेथे नागपूर ते आदिलाबाद अशी जनावरांची निर्दर्यीपणे वाहतूक होत असल्याचे उघड झाले. तेथे पोलीस पथकाला एम.एच.३०-यू.९८३२ हे बोलेरो पीकअप वाहन उभे आढळले. या वाहनाची तपासणी केली असता, मागच्या बाजूने एक लाल रंगाचा बैल चारही पाय दोरीने टोंगळ्यातून बांधलेला आढळला. त्याच्या शिंगातून रक्तही सांडत होते. वाहनाचा काच फुटलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी आणखी जवळ जाऊन बघितले असता, वाहनात आठ बाय आठ फुटमध्ये दोन वेगवेगळे कक्ष आढळले.
या दोन कक्षांमध्ये १५ बैल अत्यंत निदर्यीपणे दोरीने बांधून होते. पहिल्या बैलासारखीच त्यांचीही अवस्था होती. पोलिसांनी लगेच वाहन चालक सदीक खान पप्पू खान (२३), साकीर अहेमद कुरेशी (२२) व अब्दुल अजीज महुम्मद रसीद (३९) तिनही रा. हंसापूरी खदान, नागपूर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरूद्ध भादंवि कलम ११, तसेच प्राण्यांना निर्दयपणे वागविण्याबद्दल ६६/१९२, १३० (१), (३), १७७ व मोटर वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सोबतच वाहनामधील १ लाख ६० हजार रूपये किमतीचे १६ बैल आणि २ लाख ४0 हजारांचे वाहन, असा एकूण चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)