ग्रामीण डाकसेवेची कामे ठप्प
By Admin | Updated: March 14, 2015 02:20 IST2015-03-14T02:20:47+5:302015-03-14T02:20:47+5:30
अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघाने डाकसेवकांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी बेमुदत बंद पुकारला आहे. यामुळे ग्रामीण डाकसेवा ठप्प झाली आहे.

ग्रामीण डाकसेवेची कामे ठप्प
यवतमाळ : अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघाने डाकसेवकांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी बेमुदत बंद पुकारला आहे. यामुळे ग्रामीण डाकसेवा ठप्प झाली आहे. याचा फटका जिल्ह्यातील गावांना बसला आहे. वीज बिल वसुली आणि पेपरसेट पोहचविण्याचे काम प्रभावित झाले आहेत. तर अनेक डाक पोहचविणाऱ्या पिशव्या कार्यालयातच थांबविण्यात आल्या आहेत.
अखील भारतीय ग्रामीण डाकसेवक संघाने संपूर्ण देशभरात संप पुकारला. या संपाचे पडसाद जिल्ह्यातही उमटले आहेत. जिल्ह्यात ६८६ ग्रामीण डाकसेवक आहेत. यातील अर्धे डाकसेवक सध्या संपावर आहेत तर अर्धे कामावर आहे. यामुळे बंद ठिकाणी पत्रव्यवहार थांबला आहे. डाक विभागाकडे पत्रव्यवहारासोबत स्पीडपोस्ट, मनिआॅर्डर आणि वीज बिल वसुली सोबत मोबाईल बिल पोहचविण्याचे काम आहे. जे डाक कार्यालय संपावर आहे अशांच्या पिशव्या मुख्य डाकघरात जमा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कामे प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे.
यवतमाळ विभागीय डाक विभागासमोर बेमुदत धरणे आंदोलन डाक कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील डाक वितरणाचे कामच ठप्प झाले आहे. याचा फटका ग्रामीण भागाला बसला. डाक विभागाचे खासगीकरण करण्यात येऊ नये, सातव्या वेतन आयोगात सर्व जीडीएसना सामावून घेण्यात यावे, ५० टक्के महागाई भत्ता वेतनात समाविष्ट करण्यात यावा, अनुकंपा नोकरी मयत कुटुंबातील नातेवाईकांना देण्यात यावी, ग्रामीण डाकसेवकांना राष्ट्रीय स्वास्थ वीमा योजना लागू करण्यात यावी यांसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. मागण्या पूर्ण झाल्यानंतरच आंदोलन मागे घेण्याची भूमिका ग्रामीण डाकसेवकांनी घेतली आहे. यामुळे कामकाज प्रभावित होणार आहे. संघटणेचे विभागीय अध्यक्ष सत्यनारायणजी यमजलवार, विभागिय सचिव गजानन ठाकरे, यु.जी. देवसरकर, व्ही.एस.माने, धनपाल शंभरकर, एस.एम.राऊत, आर.आय.पोटे, एस.एस. सुखसोहळे, विलास मुंदे, आर.एम.पारीसे, आर.ए.भुरे, बि.एम. माकोडे, विनोद कावळे यांच्यासह अनेकजण यावेळी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)