विद्युत ब्रेकडाऊनने ग्रामीण जनता वैतागली
By Admin | Updated: May 3, 2015 23:56 IST2015-05-03T23:56:40+5:302015-05-03T23:56:40+5:30
तालुक्यातील जवळपास सर्वच गावठाण फिडरवर दोन महिन्यांपासून सतत बिघाड होत असून वितरण कंपनी ब्रेक ....

विद्युत ब्रेकडाऊनने ग्रामीण जनता वैतागली
इन्सूलेटर होत आहे निकामी : गावठाण फिडरवर दररोज ‘फॉल्ट’
दारव्हा : तालुक्यातील जवळपास सर्वच गावठाण फिडरवर दोन महिन्यांपासून सतत बिघाड होत असून वितरण कंपनी ब्रेक डाऊनच्या नावाखाली १२-१२ तास तर कधी दोन-दोन दिवस विद्युत पुरवठा खंडित करीत असल्याने ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे.
तालुक्यात स्वतंत्र गावठाण फिडर योजनेतून कृषीपंप व गावठाणासाठी वेगवेगळी लाईन टाकण्यात आली. गावठाणसाठी नवीन विद्युत खांब व तारांचे काम करण्यात आले. मात्र गाझियाबाद येथील कंपनीने तालुक्यात गावठाणचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने वर्षभरापासून अनेकदा या लाईनमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. पावसाच्या पाण्याने तर कधी साध्या हवेच्या झुळुकीनेही विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहे. गावठाण फिडर योजनेच्या कामात वापरण्यात आलेले इन्सूलेटर हे निकृष्ट दर्जाचे असल्याने वारंवार ते फुटून किंवा लिकेजेसमुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत.
या संदर्भात काही जागरूक नागरिकांनी ऊर्जा मंत्र्यांकडे अनेक लेखी तक्रारीही दाखल केल्या. त्यावर सदर कंपनीच्या कामासंदर्भात चौकशी करण्यात आली. मात्र नंतर संबंधित अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली हा विषय गुलदस्त्यातच आहे. तालुक्यात दररोज कुठे ना कुठे बिघाड निर्माण होत असून दारव्हा विद्युत वितरण कंपनीचे अभियंता व लाईनमन बिघाड दुरुस्तीचे काम दररोज करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. दारव्हा तालुक्याचा भार पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच पडत आहे. एका ठिकाणचा बिघाड दुरुस्त होत नाही तोच दुसऱ्या गावात बिघाड निर्माण झाल्याने दारव्हा पॉवर हाऊसवरून पुरवठा खंडित करण्यात येतो. तो बिघाड दुरुस्त होईपर्यंत इतर गावांमध्ये विद्युत पुरवठाही बंद ठेवावा लागतो.
त्यामुळे एकाचवेळी अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठ्याचा पत्ताच नसतो. तालुक्यात दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या वीज वितरणमधील बिघाडासंदर्भात अद्याप एकाही लोकप्रतिनिधीने आवश्यक ते लक्ष न घातल्याने ग्रामीण जनतेमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी पाठपुरावा केल्यास मंजूर उपकेंद्राचे काम लवकर सुरू होण्यास मदत होईल. ग्रामस्थांना निश्चित अशा प्रकारांपासून दिलासा केव्हा मिळू शकेल हे सांगण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली. (प्रतिनिधी)
उकाडा होतोय असह्य, अनेक गावात पाणीटंचाई
वीज वितरणची यत्रंणा उदासीन
तालुक्यातील अनेक गावांमध्ये दोन महिन्यांपासून विद्युत पुरवठा खंडित होण्याचा त्रास असताना वीज कंपनीच्या यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. अधिकाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविली जाते.अनेक गावात नेमकी भर दुपारीच वीज गुल होत असल्याने उकाडा असह्य होत आहे. शेतात राबून घरी आलेल्या कष्टकऱ्यांना गार वारा मिळण्याची व्यवस्थाच गावातून हद्दपार झाली आहे. लाईन नसल्याने घरगुती फॅन व कुलरचाही वापर करता येत नाही. काही ठिकाणी तर भारनियमनामुळे नळयोजना कुचकामी ठरल्या असून, पाणीटंचाईही जाणवत आहे.