धावत्या एसटी बसने घेतला पेट
By Admin | Updated: May 15, 2015 02:21 IST2015-05-15T02:21:53+5:302015-05-15T02:21:53+5:30
पंढरपूरवरून नागपूरला जाणाऱ्या बसने अचानक पेट घेण्याची घटना उमरखेड तालुक्यातील शिळोणा घाटात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.

धावत्या एसटी बसने घेतला पेट
पोफाळी : पंढरपूरवरून नागपूरला जाणाऱ्या बसने अचानक पेट घेण्याची घटना उमरखेड तालुक्यातील शिळोणा घाटात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.
पंढरपूरवरून एम.एच.०६-एस-८९२७ ही नागपूर आगाराची बस नागपूरकडे जात होती. या बसमध्ये ४१ प्रवासी होते. बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास शिळोणा घाटात बसच्या डाव्या बाजूच्या टायरने अचानक पेट घेतला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच रात्रीच्या अंधारात निर्जनस्थळी बस उभी केली. सर्व प्रवाशांना तत्काळ बसमधून बाहेर जाण्यास सांगितले. कारण आग लागलेल्या टायरच्या बाजूलाच डिझेलची टाकी होती. त्यामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. या घटनेची माहिती शिळोणा येथील नागरिकांना मिळताच त्यांनी घाटात धाव घेऊन आग विझविण्यासाठी मदत केली.
तसेच पुसदवरून अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसने नागपूरकडे रवाना करण्यात आले. एसटी बस चालक मस्के यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.
या घटनेने एसटीच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे. चालकाच्या प्रकार लक्षात आला नसता तर मागच्या बाजूने बस पेटून डिझेल टँकपर्यंत पोहोचली असती. राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षेची हमी देत असली तरी अनेकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी प्रवासी करीत आहे. (वार्ताहर)