दुष्काळी माहितीसाठी धावपळ
By Admin | Updated: December 15, 2014 23:09 IST2014-12-15T23:09:15+5:302014-12-15T23:09:15+5:30
केंद्र शासनाची एक उच्चस्तरीय समिती मंगळवार, १६ डिसेंबर रोजी कळंब तालुक्यात पीक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येत आहे. गांढा या गावाला भेट देऊन समिती शेतकऱ्यांशी हितगुज साधणार आहे.

दुष्काळी माहितीसाठी धावपळ
केंद्राच्या समितीचा धसका : कळंब तालुक्याच्या पीक परिस्थितीची पाहणी
कळंब : केंद्र शासनाची एक उच्चस्तरीय समिती मंगळवार, १६ डिसेंबर रोजी कळंब तालुक्यात पीक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येत आहे. गांढा या गावाला भेट देऊन समिती शेतकऱ्यांशी हितगुज साधणार आहे. समितीच्या भेटीमुळे अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडताना दिसून येत आहे.
यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नापिकीचा सामना करावा लागला. त्यामुळे शेतीत लावलेला पैसाही निघाला नाही. बँक व सावकाराचे कर्ज कसे फेडावे आणि लोकांची देणी कशी द्यावी, या विवंचनेत शेतकरीवर्ग आहे. त्यामुळे शासनाने भरघोस मदत करावी अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे. याचाच एक भाग म्हणून नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी समिती गांढा या गावाला भेट देणार आहे.
समितीची भेट निश्चित झाल्याने मागील चार दिवसांपासून प्रशासनाची एकच धावपळ सुरू आहे. तहसीलदार संतोष काकडे तालुक्यातील पीक परिस्थितीची माहिती गोळा करीत आहे. यासाठी कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाला लावण्यात आले आहे. शेतीचे नुकसान किती, आणेवारी काय, किती हेक्टरमध्ये कोणते पीक घेण्यात आले, याची माहिती घेतली जात आहे. केंद्रीय समितीपुढे संपूर्ण माहिती अपडेट राहावी म्हणून सर्वांना कडक निर्देश देण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)