सत्ताधारी व विरोधकांत जुंपली

By Admin | Updated: May 30, 2014 00:27 IST2014-05-30T00:27:51+5:302014-05-30T00:27:51+5:30

आचार संहितेचे उल्लंघन करून सभा घेतल्याने दिग्रस नगरपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकात गुरुवारी चांगलीच जुंपली. शिवसेना नगरसेविकांनी रौद्ररुप धारण केले. प्रश्नांचा भडीमार सुरू झाल्याने नगराध्यक्ष

The ruling and the opponents jumped | सत्ताधारी व विरोधकांत जुंपली

सत्ताधारी व विरोधकांत जुंपली

दिग्रस : आचार संहितेचे उल्लंघन करून सभा घेतल्याने दिग्रस नगरपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकात गुरुवारी चांगलीच जुंपली. शिवसेना नगरसेविकांनी रौद्ररुप धारण केले. प्रश्नांचा भडीमार सुरू झाल्याने नगराध्यक्ष आणि मुख्याधिकार्‍यांनी सभागृह सोडले. तर संतप्त नगरसेविकांनी मुख्याधिकार्‍यांना साडी-चोळीचा अहेर केला. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.
अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाची निवडणूक घोषित झाली. या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. दिग्रस तहसीलदारांनी आचार संहितेचे पालन करण्याचे आदेश नगर परिषदेसह सर्वांना दिले आहे. मात्र असे असताना दिग्रस नगर परिषदेने नगरसेवकांची सभा घेऊन ९५२ घरकुलाला बांधकामाची मुदतवाढ देण्यासह इतर ठराव मंजूर केले. विरोधी गटाच्या नगरसेवकांना नगरपरिषदेने सभा मंजूर झाल्याची सूचना दिली होती. परंतु सत्तारुढ गटाने विरोधी नगरसेवकांना अंधारात ठेवले. परंतु सभा सुरू होताच विरोधी नगरसेवक त्याठिकाणी पोहोचले. आणि सत्ताधारी  व विरोधकात चांगलीच जुंपली.
नगरपरिषदेमध्ये गुरुवात २९ मे रोजी ११ वाजता नगरसेवकांची बैठक असल्याची कुणकुण शिवसेनेच्या नगरसेवकांना लागली. शिवसेना गटनेते सुभाष अटल यांनी नगरसेवकांना निरोप देऊन नगरपरिषदेमध्ये बोलावले. सर्व नगरसेवक एकत्र आल्यावर त्यांनी सभागृहात धाव घेतली. परंतु तोवर सत्तारुढ गटाने विषयसूचीतील विषयांना मंजुरी दिली. त्यावर विरोधकांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांवर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. आचारसंहिता असल्याने सभा रद्द म्हणून आम्हाला कळविण्यात आले.
त्यानंतरही सभा कशी घेतली म्हणून गोंधळ सुरू झाला. दरम्यान नगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांनी सभागृहातून काढता पाय घेतला. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेविकांनी रौद्ररुप धारण केले. रद्द झालेली सभा आचारसंहिता असताना कशी घेतली, याचा जाब विचारत मुख्याधिकार्‍याच्या कक्षात ठिय्या दिला. दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी शिवसेनेच्या नगरसेविकांना तुमचे काय म्हणणे आहे, असे विचारले. त्यावर नगरसेविकांनी आम्हाला मुख्याधिकार्‍यांनाच जाब विचारायचा आहे, असे सांगितले. त्यानंतर मुख्याधिकार्‍यांशी मोबाईलवरून संपर्क साधला असता यवतमाळला निघाल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेविकांनी मुख्याधिकार्‍यांच्या कक्षातील खुर्चीला साडी-चोळी व बांगड्यांचा अहेर केला.
सभागृह सोडून जाताना नगराध्यक्ष संजीवनी कोळशे यांना विचारणा केली असता, त्यांनाच विचारा, असे बोलून त्या निघून गेल्या. मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना मोबाईलवरून विचारणा केली असता दोन्ही गटातील नगरसेवकांचा अंतर्गत मामला असल्याचे सांगितले. गुरुवारी सभा होऊन ठराव पास झाल्याचे व पवार नामक अधिकार्‍यांकडे त्याची माहिती असल्याचे मुख्याधिकार्‍यांनी सांगितले. एकंदरित दिग्रस नगरपरिषदेतत सत्तारुढ व विरोधकात चांगलीच जुंपल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The ruling and the opponents jumped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.