दारू विक्रेत्यांकडून नियमांची पायमल्ली
By Admin | Updated: January 28, 2015 23:42 IST2015-01-28T23:42:25+5:302015-01-28T23:42:25+5:30
शहरात राजरोसपणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. दारू दुकाने उघडी ठेवण्यासाठी वेळ निर्धारित केली आहे. मात्र त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत ही दुकाने सुरूच असतात.

दारू विक्रेत्यांकडून नियमांची पायमल्ली
उमरखेड : शहरात राजरोसपणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. दारू दुकाने उघडी ठेवण्यासाठी वेळ निर्धारित केली आहे. मात्र त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत ही दुकाने सुरूच असतात. यामुळे शहराच्या समाजस्वास्थ्यावरही विपरित परिणाम होत आहे.
शहरातील किरकोळ मद्यविक्रेत आदेशाचे उल्लंघन करून सकाळी ५ वाजता आपली दारु दुकाने उघडून रात्री उशिरापर्यंत उघडी ठेवत असल्याचे निदर्शनास येत आहे. उत्पादन शुल्क अधिकारी तसेच पोलीस अधिकारी मात्र आपसी संबंध जोपासत या एकूणच प्रकाराकडे सोईस्कर कानाडोळा करून आहेत. शहरात पाच बीअर बार व शहरालगत बीअर बार, दोन वाईन शॉप आहेत. चार देशी दारु विक्रीचे परवानाधारक आहेत. देशी दारु दुकाने उघडण्याची निर्धारित वेळ सकाळी १० वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंतच आहे. परंतु शहरातील दारु दुकाने चक्क ५ वाजताच उघडण्यात येऊन त्यासमोर मद्यशौकिनांच्या रांगा लागताना दिसतात. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना भल्या पहाटेच हे चित्र पहायला मिळते. अगदी सकाळी ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती, शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी बाहेर पडतात. त्यांच्या नजरेला हे दृष्य पडते. कित्येक प्रसंगी त्यांना नाकाला रुमाल लावून मार्गाक्रमण करावे लागत. विशेष म्हणजे रस्ते सुरक्षा पथकाला देखील हे ‘गुड मॉर्निंग’चे दृष्य पहायला मिळते. परंतु ते ही याकडे कानाडोळा करताना दिसतात. नागरिकांना मानसिक स्वास्थ्य मिळावे म्हणून दारु दुकाने उघडण्याच्या तथा बंद करण्याच्या वेळा निश्चित केलेल्या असूनही अधिकाऱ्यांच्या आणि पोलिसांच्या मधूर संबंधातून आदेशाची अवहेलना होत आहे. अगदी पहाटेच मद्द शौकिनांची दारुने सुरुवात होत असून, व्यसनाधिनता वाढीस लागून सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याने यावर निर्बंध लावावेत, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)