नियमबाह्य वेतनाचा धडाका

By Admin | Updated: September 1, 2014 00:17 IST2014-09-01T00:17:00+5:302014-09-01T00:17:00+5:30

येथील नगरपरिषदेमध्ये कर्मचाऱ्यांचे नियमबाह्य वेतन काढण्याचा धडाका सुरू आहे़ मात्र यावर कुणाचाही वचक नसल्याने नगरपरिषद व शासनाचे प्रचंड नुकसान होत आहे.

Rule of External Risk | नियमबाह्य वेतनाचा धडाका

नियमबाह्य वेतनाचा धडाका

नगरपरिषद वणी : उपसंचालकांकडून तक्रार बेदखल
वणी : येथील नगरपरिषदेमध्ये कर्मचाऱ्यांचे नियमबाह्य वेतन काढण्याचा धडाका सुरू आहे़ मात्र यावर कुणाचाही वचक नसल्याने नगरपरिषद व शासनाचे प्रचंड नुकसान होत आहे.
नगरपरिषदेमधील कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती लागू नसतानाही ती सन २००२ पासून कर्मचाऱ्यांना देण्यात आली़ त्याची वसुली करण्याचे आदेश तत्कालीन उपसंचालकांनी दिले होते. मात्र अद्याप कर्मचाऱ्यांकडून पूर्णपणे वसुली करण्यात आली नाही़ कर्मचाऱ्यांच्या दीर्घ रजेच्या काळातील नक्षलग्रस्त भत्ता व वाहन भत्ताही काढण्यात आला आहे. नगरपरिषदेचा ठराव नसतानाही कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता, वाहन भत्ता व काही कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रतीपूर्ती देयके काढण्यात आली आहे. केवळ २० टक्के शिक्षकांना निवड श्रेणी मंजूर असताना सरसकट सर्वच निवृत्त शिक्षकांना निवड श्रेणी देण्यात आली आहे.
यापैकी अनेकांनी वरिष्ठ श्रेणी नंतर १२ वर्षांची सेवाही केली नाही़ आपली शैक्षणिक पात्रताही वाढविली नाही़ तरीही त्यांना लाभ देण्यात आला. नगरपरिषद शाळेत २०० पेक्षा कमी विद्यार्थी असतानाही मुख्याध्यापक पदाची वेतनश्रेणी देण्यात आली़ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासीत योजना लागू नसतानाही, ती देण्यात आली़ शिक्षक व शिक्षकेतरांनी घेतलेल्या अग्रीमाचे समायोजन करण्यात आले नाही़ लेखा परीक्षकांनी काही शिक्षकांच्या चुकीच्या वेतनश्रेणीची वसुली करण्याचे आदेश गेल्या २८ जूनला दिले होते़ मात्र वेतनात सुधारणा करून अद्याप त्याची वसुली करण्यात आली नाही़
या सर्व बाबींबाबत स्विकृत सदस्य पीक़े़ टोंगे यांनी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे तक्रार केली आहे़ तत्पूर्वी शिक्षण उपसंचालकांनी २१ मे २०१३ च्या पत्रानुसार चार अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले़ परंतु या चौकशीचा अहवाल अजूनपर्यंत प्राप्त झाला नाही. त्यामुळे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यप्रणालीवरच आता शंका घेण्यात येत आहे़ शिक्षण उपसंचालक राम पवार यांच्याच वर्तनाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी टोंगे यांनी शिक्षण सचिवांकडे तक्रारीतून केली आहे. त्यावर आता शासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Rule of External Risk