‘आरटीआय’ कार्यकर्ता अपघातात ठार
By Admin | Updated: May 24, 2016 00:03 IST2016-05-24T00:03:46+5:302016-05-24T00:03:46+5:30
भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि आरटीआय संघटनेचे तालुकाध्यक्ष ठार झाल्याची घटना ....

‘आरटीआय’ कार्यकर्ता अपघातात ठार
पांढरकवडाची घटना : घातपाताचा संशय
पांढरकवडा : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि आरटीआय संघटनेचे तालुकाध्यक्ष ठार झाल्याची घटना येथील राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. हा अपघात नसून खून असल्याचा संशय व्यक्त करीत पांढरकवडा पोलिसात भावाने तक्रार दिली आहे.
सुभाष हेमचंद सुराणा (४०) रा. पांढरकवडा असे मृत आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे. सुभाष रविवारी सायंकाळी ७ वाजता उमरी नजीक असलेल्या आपल्या शेतात जाण्यासाठी दुचाकीने निघाले. त्यानंतर शेतातून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले. हा प्रकार लक्षात येताच पांढरकवडा पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान नरेश मिठ्ठूलाल सुराणा यांनी हा अपघाती मृत्यू नसून नियोजनबद्ध रितीने सुभाषला संपवून टाकल्याची तक्रार पांढरकवडा पोलीस ठाण्यात देण्यात आली. विशेष म्हणजे त्यांच्या शेताचा वादही न्यायालयात सुरू होता. नुकताच या प्रकरणाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला होता.
तसेच त्यांनी माहिती अधिकाराअंतर्गत तालुक्यातील अनेक प्रकरणांची माहिती बाहेर काढली होती. त्यामुळेच त्यांचा कुणी तरी खून केला असावा असा आरोप आहे. दरम्यान पांढरकवडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून अधिक तपास गुलाबराव वाघ करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)