दुष्काळातही ३०० कोटींच्या पीक कर्जाची परतफेड

By Admin | Updated: March 31, 2016 02:55 IST2016-03-31T02:55:12+5:302016-03-31T02:55:12+5:30

पीक आणेवारी ५० पैशाच्या आत निघाल्याने संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या यादीत असला तरी याच जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेने तब्बल ३०० कोटी रुपयांच्या पीक कर्जाची वसुली केली आहे.

Rs 300 crore crop loan repayment for drought | दुष्काळातही ३०० कोटींच्या पीक कर्जाची परतफेड

दुष्काळातही ३०० कोटींच्या पीक कर्जाची परतफेड

जिल्हा मध्यवर्ती बँक : शून्य टक्के व्याजाचा लाभ, नव्या कर्जास पात्र
यवतमाळ : पीक आणेवारी ५० पैशाच्या आत निघाल्याने संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या यादीत असला तरी याच जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेने तब्बल ३०० कोटी रुपयांच्या पीक कर्जाची वसुली केली आहे. वसुलीचा आकडा पाहता बँकेच्या यंत्रणेकडून दुष्काळ आणि पीक आणेवारीच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०१५ च्या खरीप हंगामात ३५६ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले होते. गेली वर्षभर या कर्जाची वसुली संथ गतीने सुरू होती. परंतु मार्च महिना उजाडताच या कर्ज वसुलीला गती आली आहे. शासनाने जारी केलेल्या सलग दुसऱ्या जीआरमध्ये जिल्ह्यातील दोनच गावांचा दुष्काळग्रस्त म्हणून उल्लेख आहे. अर्थात उर्वरित सर्व गावात पीक परिस्थिती आलबेल असून तेथे बँकांना सक्तीच्या कर्ज वसुलीची मूभा मिळाली आहे.
परंतु अद्याप आम्ही कर्ज वसुलीसाठी सक्तीचा मार्ग अवलंबिला नसून परंपरागत अर्थचक्रावर विसंबून असलेले शेतकरी स्वत:हून आपले कर्ज परतफेड करीत असल्याचा बँकेचा दावा आहे. बँकेची गुरुवारी ३१ मार्च अखेरपर्यंत सुमारे ३०० कोटींच्या पीक कर्जाची वसुली होणार आहे.
बुधवारपर्यंत वसुलीचा आकडा २७० कोटींवर पोहोचला होता. ३१ मार्चपूर्वी पीक कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळतो. हा लाभ डोळ्यापुढे ठेऊनच जिल्ह्यातील सुमारे ७० हजार शेतकरी आपल्या कर्जाची नियमित परतफेड करतात. गेल्या काही वर्षात दुष्काळ, नापिकी या संकटांसोबतच व्याज माफी, कर्जमाफी येऊन गेली. परंतु या ७० हजार शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाच्या परतफेडीचे अर्थचक्र बंद पडू दिले नाही. आजही ते सुरु आहे. त्यामुळेच ३५६ कोटी वाटणाऱ्या जिल्हा बँकेचे दुष्काळाच्या छायेतही ३०० कोटी रुपये पीक कर्ज वसूल झाले आहे. याशिवाय २५ कोटींचे मुदती कर्ज थकीत असून त्याचीही वसुली सुरू आहे.
३१ मार्चनंतर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख सवलत योजनेचा ३ टक्के व्याजाचा लाभ मिळतो. उर्वरित पाच टक्के व्याज त्यांना कर्जावर भरावेच लागते. ३०० कोटी रुपये पीक कर्ज परतफेड करणारे जिल्ह्यातील हे ७० हजार शेतकरी सन २०१६ च्या खरीप हंगामातील नव्या पीक कर्जासाठी पात्र ठरले आहे. त्यांना गत वर्षीच्या कर्जाच्या रकमेत सुमारे दहा टक्के वाढही दिली जाणार असल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)

१ लाख १७ हजार शेतकऱ्यांकडे ४५० कोटी थकीत
जिल्ह्यात सतत दुष्काळी मदत, व्याजमाफी, कर्जमाफीची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्हा बँकेच्या लेखी १ लाख १७ हजार आहे. या शेतकऱ्यांकडे गेल्या कित्येक वर्षांपासून तब्बल ४५० कोटी रुपये पीक कर्ज थकीत आहे. त्यात यवतमाळ, दिग्रस, महागाव, दारव्हा या तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या पाच-सात वर्षांपासून हे शेतकरी थकबाकीदार आहेत. शासनाच्या व्याज माफीच्या योजनेनंतर या शेतकऱ्यांच्या कर्जाचे रुपांतर केले गेले होते. अर्थात त्यांना पाच वर्षांचे पाच हप्ते पाडून दिले गेले होते. मात्र सुलभ हप्त्यानेही या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. आता कुणी प्रकल्पात जमिनी गेलेल्या पैशातून तर कुणी विकलेल्या जमिनीच्या पैशातून कर्ज चुकविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या विरोधात जिल्हा बँकेने अद्याप कठोर भूमिका घेतलेली नाही.

Web Title: Rs 300 crore crop loan repayment for drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.