रोटरीच्या ‘एज्युफेस्ट’ने दिली शिक्षणाची नवी दिशा
By Admin | Updated: January 24, 2015 23:02 IST2015-01-24T23:02:40+5:302015-01-24T23:02:40+5:30
दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळते. या शिक्षणानंतर पुढे कुठल्या क्षेत्राची निवड करायची, हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांना पडतो.

रोटरीच्या ‘एज्युफेस्ट’ने दिली शिक्षणाची नवी दिशा
यवतमाळ : दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळते. या शिक्षणानंतर पुढे कुठल्या क्षेत्राची निवड करायची, हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांना पडतो. यावेळी जर का दिशा चुकली तर, संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते. यावर मात करण्यासाठी रोटरी क्लब आॅफ यवतमाळ मिडटाऊनतर्फे ‘रोटरी एज्यूफेस्ट’चे (शिक्षण महोत्सव) आयोजन करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला जाणून घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचे जत्थे यवतमाळात दाखल होत आहेत.
येथील स्टेट बँक चौकातील खुल्या जागेत हा शिक्षण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातील विविध नामांकित शाळा-महाविद्यालयांनी माहिती सांगण्यासाठी विविध स्टॉल्स लावले आहेत. या स्टॉल्सवर केवळ कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचेचे नव्हे तर, शिक्षण क्षेत्रातील विविध दालने खुली करण्यात आली आहेत. ३९ स्टॉल्स याठिकाणी लावण्यात आले आहे. चार हजार विद्यार्थ्यांनी दोन दिवसात या स्टॉल्सला भेटी दिल्या. यासोबतच विविध विषयांचे मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांना निमंत्रित करण्यात आले आहे.
दहावीनंतरचे करिअर गायडन्स, बारावीनंतर अभियांत्रिकीला प्रवेश, विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी, सैनिक प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा आणि पालकांनी घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन विविध तज्ज्ञांनी केले. या मार्गदर्शनाला तीन हजार विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. थेट ग्रामीण भागातील विद्यार्थी माहिती जाणून घेण्यासाठी याठिकाणी पोहोचले होते. (शहर वार्ताहर)