शेतकरी संघटनेचा रूमणे मोर्चा

By Admin | Updated: January 31, 2015 00:17 IST2015-01-31T00:17:43+5:302015-01-31T00:17:43+5:30

दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजची चिरफाड करण्याकरिता तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्याकरिता शेतकरी संघटनेच्यावतीने ...

Room for the Farmer's Organization | शेतकरी संघटनेचा रूमणे मोर्चा

शेतकरी संघटनेचा रूमणे मोर्चा

दारव्हा : दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजची चिरफाड करण्याकरिता तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्याकरिता शेतकरी संघटनेच्यावतीने येथील उपविभागीय कार्यालयावर रूमणे मोर्चा काढण्यात आला.
शेतकरी नेते सुरेश गावंडे यांनी एकट्याने पुढाकार घेऊन काढलेल्या या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला. शेतकरी बैलगाड्या, रूमणे घेऊन मोठ्या संख्येने या मोर्चात सामील झाले होते.
आर्णी रोडवरील सर्कस मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहोचला. तिथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सुरेश गावंडे यांनी राज्य शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजवर कडाडून टीका केली.
ते म्हणाले सात हजार करोड रुपयाचे पॅकेज दिले असले तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष ८४२ करोडचीच मदत होणार आहे. उर्वरित पैशाने वेगवेगळ्या मार्गाने कारखानदार, सावकार बँक, वीज मंडळाचे खिसे भरले जाणार आहे. पॅकेजची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिल्या गेली असती तर हेक्टरी ४० हजार रुपये मदत मिळाली असती, मदतीचे निकष ठरविताना शासनाने विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असा भेदभाव केल्याचा आरोप सुरेश गावंडे यांनी केला.
उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात राज्य शासनाने वचननाम्याप्रमाणे सातबारा कोरा करावा, कापसाला सात हजार तर सोयाबीनला पाच हजार, तुरीला सहा हजार हमी भाव ठरवावा, घरगुती वीज बिलात दरवाढ करू नये, वनजमिनीलगतच्या शेताला तार कुंपन करण्यात यावे, युरियाचे वाढलेले भाव कमी करावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या. सुरेश गावंडे यांनी मोर्चाचे आयोजन करताना गावागावात फिरून जागृती केल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Room for the Farmer's Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.