‘ब्रेव्ह हार्ट’मधील पित्याची भूमिका अविस्मरणीय

By Admin | Updated: May 14, 2017 01:13 IST2017-05-14T01:13:30+5:302017-05-14T01:13:30+5:30

‘श्वास’ हा पहिलाच चित्रपट आणि त्याच चित्रपटामुळे मला प्रसिद्धी मिळाली. आॅस्करपर्यंत गेलेल्या

The role of Father in Brave Heart is unforgettable | ‘ब्रेव्ह हार्ट’मधील पित्याची भूमिका अविस्मरणीय

‘ब्रेव्ह हार्ट’मधील पित्याची भूमिका अविस्मरणीय

अरुण नलावडे : प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने यवतमाळ भेटीत उलगडला कलाप्रवास
काशीनाथ लाहोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘श्वास’ हा पहिलाच चित्रपट आणि त्याच चित्रपटामुळे मला प्रसिद्धी मिळाली. आॅस्करपर्यंत गेलेल्या या मराठी चित्रपटाला ‘सुवर्ण कमळ’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खरे म्हणजे इयत्ता पाचवीपासूनच मी चित्रपटात कामे करीत आहे. आतापर्यंत १०० चित्रपटातून अभिनय केला. परंतु नाव झाले ते ‘श्वास’मुळेच. असे असले तरी ‘ब्रेव्ह हार्ट’ या चित्रपटात लहान मुलाचे एक-एक अवयव निकामी होत असतानाचा असहाय पिता ही भूमिका माझ्या आजपर्यंतच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय आहे, असे मत प्रसिद्ध मराठी अभिनंते अरुण नलावडे यांनी व्यक्त केली.
‘ग्रीन अँड क्लिन सिटी’ हा पर्यावरणावर आधारित मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी नलावडे यवतमाळ येथे आले होते. या चित्रपटात विनोद काळे, संजय माटे, दशरथ मडावी, चारूलता पावसेकर, अ‍ॅड. चानेकर आदी स्थानिक कलावंतही भूमिका करीत आहेत.
मराठी चित्रपटात विविधांगी भूमिका केल्याबद्दल यावर्षी नलावडे यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या लोकप्रिय असलेली मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ यात त्यांची नानाजींची भूमिका आहे. दिग्दर्शक राज दत्त आणि नलावडे यांच्या हंस प्रॉडक्शनतर्फे शुक्रवारी ‘हाक’ हा मराठी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. जैतापूर अनुऊर्जा प्रकल्पाची पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे. वेश्यांच्या मुलांच्या पुनर्वसनावर आधारित ‘वारसा’ हा त्यांचा उल्लेखनीय चित्रपट, तर वैदर्भीय भूमीवरचा ‘तानी’ हा त्यांचा चित्रपटही वेगळा आहे.
‘का रे दुरावा’, ‘वादळवारा’, ‘आभाळ माया’, ‘अवघाचि संसार’ आदी सात मराठी आणि तीन हिंदी मालिकांमधून नलावडे यांनी भूमिका केल्या आहेत. मराठी चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले, आजकाल वाहिन्यांनी निर्माण केलेले चित्रपट चालतात. ‘सैराट’सारखा चित्रपट प्रचंड यश मिळवितो आणि दर्जेदार कलात्मक चित्रपट मागे पडतात ही शोकांतिका आहे. प्रेक्षकांनाही धांगडधिंगाच आवडतो, असे वाटू लागले आहे.
अरुण नलावडे मूळचे कोकणातील. संगमनेर तालुक्यातील करजुवे हे त्यांचे गाव. कोकणात आजही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ ही त्यातलीच एक मालिका होती. विशेष म्हणजे, सर्वस्तरातील मंडळी ही मालिका पाहात होते.

Web Title: The role of Father in Brave Heart is unforgettable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.