रोहयोच्या कामांचे वाजले तीनतेरा
By Admin | Updated: October 14, 2015 02:56 IST2015-10-14T02:56:11+5:302015-10-14T02:56:11+5:30
दारव्हा तालुक्यातील महागाव (कसबा) जिल्हा परिषद गटामध्ये सध्या रोहयो कामाचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे.

रोहयोच्या कामांचे वाजले तीनतेरा
महागाव (कसबा) : दारव्हा तालुक्यातील महागाव (कसबा) जिल्हा परिषद गटामध्ये सध्या रोहयो कामाचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे. अधिकारी, पदाधिकारी नियमांना बगल देऊन ही योजना कुचकामी ठरवित आहे.
गरिबांना रोजगाराची हमी देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये १०० टक्के मजुरांना काम मिळावे म्हणून सिंचन विहिरी, तलाव, शेततळे, पांदण रस्ते आदी कामे केली जातात. पण या योजनेचा रोजमजुरांऐवजी अधिकारी, कर्मचाऱ्यांनाच फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. मजुरांना कामे देण्याऐवजी अधिकारी व पदाधिकारीच योजना हडप करीत असल्याचे बोलले जात आहे. अनेक गावांमध्ये पांदण रस्ते अर्धवट अवस्थेत पडून आहेत. त्या रस्त्यावरून माणसाला चालणे कठीण होत आहे. काही पांदण रस्त्यांचे काम तर सुरू झाले. मात्र हे काम पूर्णत्वास नेण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. परंतु संपूर्ण काम झाल्याचे दाखवून बिल वसूल केले जात आहे. पांदण रस्ते, विहिरी, शेततळे अशी कामे या योजनेंतर्गत मजुरांकडून करून घेणे बंधनकारक आहे. पण अधिकारी बरीच कामे यंत्राद्वारे करण्याकडे भर देतात. या योजनेतील अनेक कामे नियमबाह्य पद्धतीने झाली असून शासनाच्या निधीची वाट लावली जात आहे. वरिष्ठांनी कामाची पाहणी करावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)