रोहयोचा वार्षिक कृती आराखडा १०० कोटींवर
By Admin | Updated: April 3, 2016 03:51 IST2016-04-03T03:51:53+5:302016-04-03T03:51:53+5:30
रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात वर्षभरात १०० कोटींची कामे झाली असून यातील अर्धाअधिक निधी सिंचन विहिरींच्या कामावर खर्च झाला आहे.

रोहयोचा वार्षिक कृती आराखडा १०० कोटींवर
११ कोटी अडकले : विहिरींचे मस्टर प्रभावित, १२ हजार मजूर सेल्फवर
रूपेश उत्तरवार यवतमाळ
रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात वर्षभरात १०० कोटींची कामे झाली असून यातील अर्धाअधिक निधी सिंचन विहिरींच्या कामावर खर्च झाला आहे. तर याच कामातील ११ कोटींचा निधी अडकला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मस्टर पंचायत विभागात अडकले आहे.
रोेजगार हमी योजनेतून जिल्ह्यात गतवर्षी ८२ कोटींची कामे करण्यात आली होती. यावर्षी याच योजनेमधून १०० कोटींची कामे झाली आहे. यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामाला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे उघड झाले आहे. यापेक्षाही अधीक कामे जिल्ह्याला करता आली असती. मात्र मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने अनेक कामे थांबली आहेत. जिल्ह्यातील १२ हजार ७२७ कामे सेल्फवर आहेत. मात्र मजूर नसल्याने या ठिकाणी कामे खोळंबली आहेत. जिल्ह्यातील सात हजार विहिरींना मजूर भेटले नाही. यामुळे शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या विहिरी पूर्ण करता आल्या नाही. यातून शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न सध्यातरी मृगजळ ठरले आहे.
रोजगार हमी योजनेतून जी कामे करण्यात आली. त्यातील ११ कोटी रूपयांचा निधी अद्यापही मिळायचा आहे. शासनाच्या तिजोरीत पैसा नसल्याने गत महिनाभरापासून निधीची ओरड सुरू आहे. यातून विहिरींचे मस्टर थांबले आहे. तर अनेक शेतकऱ्यांना विहिरीचा निधी मिळावा म्हणून शासन दरबारी येरझारा माराव्या लागत आहे. अशीच स्थिती रोजगार हमी योजनेतून होणाऱ्या इतर कामांची आहे. यामुळे सर्वसामान्यांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. यासोबतच शौच्छालय, पांदन रस्ते, राजीव गांधी भवन, सार्वजनिक विहीरी, मैदान निर्मिती, वृक्ष लागवडसह अनेक कामांचा समावेश आहे.