रोहिणी-मृगाचा दगा, आर्द्राची आशा
By Admin | Updated: June 21, 2014 02:07 IST2014-06-21T02:07:11+5:302014-06-21T02:07:11+5:30
रोहिणी, मृग नक्षत्राने दगा दिल्यानंतर २२ जूनपासून सुरू होणाऱ्या आद्रा नक्षत्रावर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

रोहिणी-मृगाचा दगा, आर्द्राची आशा
ज्ञानेश्वर मुंदे यवतमाळ
रोहिणी, मृग नक्षत्राने दगा दिल्यानंतर २२ जूनपासून सुरू होणाऱ्या आद्रा नक्षत्रावर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ सहा टक्के पाऊस झाल्याने पेरण्याही ठप्प आहे. विशेष म्हणजे गतवर्षी जून महिन्यात ११ दिवसात ३४८ मिमी पाऊस कोसळला होता आणि ४१ टक्के पेरण्याही पूर्ण झाल्या होत्या.
यावर्षी शेतकऱ्यांना आकाशाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. अद्यापही मान्सून सक्रिय झाला नसल्याने जिल्ह्यात कुठेही दमदार पाऊस झाला नाही. रोहिणी नक्षत्राला २५ मे रोजी प्रारंभ झाला. मात्र आकाशात ढगच दिसत नव्हते. त्यानंतर शेतकऱ्यांना आशा होती ती मृग नक्षत्राची. ८ जून रोजी मृग नक्षत्राला प्रारंभ झाला. अपवाद वगळता संपूर्ण नक्षत्रात आकाश निरभ्र राहिले. आता शनिवार २१ जून रोजी मृग नक्षत्र संपत आहे. गेल्या कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात मृगाचा दमदार पाऊस बरसला नाही. आजही उन्हाळ्यासारखी ऊन तापत आहे.विशेष म्हणजे यावर्षी मृग नक्षत्राचे वाहन हत्ती आहे. हत्ता वाहन असलेल्या मृगात जोरदार पाऊस बरसतो, असे जाणकार सांगतात. मात्र यावर्षी मृगाचे वाहन असलेल्या हत्तीने शेतकऱ्यांना पायी तुडविल्याचे दिसत आहे. मृग नक्षत्र २१ जून रोजी संपत असून २२ जूनपासून आद्रा नक्षत्राला प्रारंभ होत आहे. रोहिणी आणि मृगाने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांची आशा या नक्षत्रावर लागून आहे. पुणे-मुंबईपर्यंत धडकलेला मान्सून विदर्भात मात्र सक्रिय नाही. वातावरणात बदल जाणवत असून वेगाने वाहनारे वारे आणि वातावरणात वाढलेली आद्रता पावसाची लक्षणे सांगत आहे. त्यामुळे आद्रा नक्षत्रात निश्चितच पाऊस बरसेल, अशी आशा आहे.