कोरेगाव भिमा येथे दगडफेकीत रोहणादेवीचा तरुण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 23:34 IST2018-01-04T23:32:19+5:302018-01-04T23:34:14+5:30
कोरेगाव भिमा येथे शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेला दिग्रस तालुक्यातील रोहणादेवी येथील तरुण दगडफेकीत गंभीर जखमी झाला आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयात त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो मृत्यूशी झुंज देत आहे.

कोरेगाव भिमा येथे दगडफेकीत रोहणादेवीचा तरुण गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरेगाव भिमा येथे शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेला दिग्रस तालुक्यातील रोहणादेवी येथील तरुण दगडफेकीत गंभीर जखमी झाला आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयात त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो मृत्यूशी झुंज देत आहे.
अमित परशराम भोंगाडे (२१) रा. रोहणादेवी असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो रोहणादेवी आरपीआय शाखेचा प्रमुख आहे. दहा-बारा तरुणांना सोबत घेऊन तो कोरेगाव भिमा येथे अभिवादन करण्यासाठी गेला होता. मात्र त्या ठिकाणी झालेल्या दगडफेकीत तो गंभीर जखमी झाला. एका पेट्रोल पंप चालकाने त्याला पुण्याजवळील शिक्रापूर रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे त्याच्या मेंदूवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या दगडफेकीत त्याचा आतेभाऊ अविनाश घुलेराव रा. रोहणादेवी हाही जखमी झाला.
तो दिग्रस येथे पोहोचला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले. पुणे येथील महानगरपालिका आरपीआयचे उपाध्यक्ष डॉ. धेंडे व सामाजिक कार्यकर्ते कांबळे अमितच्या प्रकृतीकडे लक्ष ठेऊन आहेत. तर दिग्रस येथून त्याच्या मदतीसाठी सात ते आठ तरुण जात असल्याची माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.