दारूच्या गोदामावर दरोडा
By Admin | Updated: October 22, 2014 23:24 IST2014-10-22T23:24:21+5:302014-10-22T23:24:21+5:30
चौकीदाराला आणि त्याच्या पत्नीला १५ ते २० जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राच्या धाकावर खोली कोंडून ट्रकद्वारे तब्बल ३६ लाख रुपयांची विदेशी दारू लंपास केली. ही घटना येथील आर्णी मार्गावरील वाघाडी

दारूच्या गोदामावर दरोडा
३६ लाखांची दारू लंपास : दाम्पत्याला शस्त्राच्या धाकावर कोंडले
यवतमाळ : चौकीदाराला आणि त्याच्या पत्नीला १५ ते २० जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राच्या धाकावर खोली कोंडून ट्रकद्वारे तब्बल ३६ लाख रुपयांची विदेशी दारू लंपास केली. ही घटना येथील आर्णी मार्गावरील वाघाडी नदी परिसरात घडली. घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. मात्र अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांच्या आदेशानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
रमेश होतलदास मंगतानी रा. पत्रकार कॉलनी असे दारू गोदामावर दरोडा पडलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. मंगतानी यांचे येथील आर्णी मार्गावर परवानाकृत दारूचे गोदाम आहे. २० आॅक्टोबरला मध्यरात्री १५ ते २० अज्ञात दरोडेखोर अचानक तेथे आले. यावेळी गोदामावरील चौकीदार आणि त्याच्या पत्नीला झोपेतून उठवून टोळक्याने शस्त्राच्या धाकावर दमदाटी केली. तसेच लगतच्या एका खोलीत कोंडून दिले. भीतीपायी आणि गोदाम निर्जनस्थळी असल्याने आरडाओरड करूनही उपयोग नव्हता. त्यामुळे ते शांत राहिले. दरम्यान दरोडेखोरांनी ट्रकद्वारे तब्बल ३५ लाख ७० हजार रुपयांची दारू चोरुन नेली. तसेच पसार झाले. दुसऱ्या दिवशी ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली. त्यानंतर मंगतानी यांनी वडगाव रोड पोलिसात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी संशय उपस्थित करून तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली. नवनिर्वाचित आमदार मदन येरावार यांनी या प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक बिहारी आणि पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)