राजस्थानी सावकारांकडून लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:33 IST2018-03-17T22:33:47+5:302018-03-17T22:33:47+5:30
शेतपिकावर आलेल्या विविध संकटांमुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र मंदावले असून त्याचाच फायदा घेत वणी उपविभागातील ग्रामीण भागात राजस्थानी सावकारांनी आपले जाळे विणले आहे.

राजस्थानी सावकारांकडून लूट
ऑनलाईन लोकमत
वणी : शेतपिकावर आलेल्या विविध संकटांमुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र मंदावले असून त्याचाच फायदा घेत वणी उपविभागातील ग्रामीण भागात राजस्थानी सावकारांनी आपले जाळे विणले आहे. या परिसरात अनेक वर्षांपासून आंध्रातील सावकारांचीही दंडेली सुरू आहे. अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारून ग्रामीणांना लुटले जात आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राजस्थानातील सावकारांची टोळी वणी, झरी, मारेगाव परिसरात ठिय्या देऊन असली तरी या बेकायदेशिर सावकारीबाबत प्रशासकीय यंत्रणा अनभिज्ञ आहे. तालुक्याच्या ठिकाणी किरायाच्या खोल्या करून हे सावकार वास्तव्याला असल्याची माहिती एका जाणकाराने दिली. पाच ते सहा जणांचे हे टोळके ग्रामीण भागातील गरजूंना हेरून त्यांना अव्वाच्या सव्वा व्याज आकारून पाच हजारापासून ते ५० हजारांपर्यंत कर्जाचे वाटप करीत आहेत. एखाद्याने एका हंमागात १० हजार रुपये कर्ज घेतले तर त्याला परतफेड करताना १३ हजार रुपये द्यावे लागत आहेत.
या राजस्थानी सावकारांनी गावागावांत कमिशनवर आपले एजंट पेरले असून त्यांच्या माध्यमातून सावकारीचा हा अवैध व्यवसाय जोमात सुरू आहे. राजस्थानी सावकारांनी नेमलेले हे एजन्ट स्थानिक गावातीलच रहिवासी असून गरजू लोक त्यांच्या माध्यमातूनच सावकारांपर्यंत पोहचत आहे. जोपर्यंत हा एजन्ट कर्जदाराची शिफारस करीत नाही, तोपर्यंत संबंधिताला कर्ज दिले जात नाही. याबदल्यात एजन्टांनाही चांगले कमिशन मिळत आहे. कर्जाने दिलेल्या रकमेची वसुली करण्याची जबाबदारीदेखील या एजन्टांवरच सोपविली जाते.
एजन्टाने शिफारस केल्यानंतर राजस्थानी सावकारांची ही टोळी सर्वप्रथम कर्जदाराच्या घरी जाऊन परिस्थितीची चाचपणी करतात. त्याच्या परिस्थितीची पाहणी करूनच त्यानुसार त्याला कर्जाची रक्कम दिली जाते.
वणी, मारेगाव व झरी तालुक्यात कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणावर केला जातो. यंदा मात्र कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना ५० टक्क्यापेक्षाही कमी उत्पादन झाले. तूर उत्पादकांना अद्याप चुकारेच मिळाले नाहीत. सर्वस्वी शेती व्यवसायावर अवलंबून असणाºया ग्रामीण भागातील आर्थिक घडी चांगलीच विस्कटली आहे. परिणामी त्याचाच गैरफायदा अवैध सावकारांकडून घेतला जात आहे. त्यातून ग्रामीण नागरिकांची लूट केली जात आहे. या अवैैध सावकारांच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी होत आहे.
अण्णांकडून कर्जाच्या रकमेसोबत साहित्याची विक्री
वणी, झरी, मारेगाव तालुक्यात राजस्थानी सावकारांचा प्रवेश होण्याअगोदर आंध्रप्रदेशातील अण्णांचा या भागात दबदबा होता. तो आताही आहे. मात्र या सावकारांचा कर्ज वाटपाचा फंडा आहे. या सावकारांकडून कर्जाच्या रकमेसोबत बॅटरी, ब्लँकेट यासारखे साहित्य कर्जदाराच्या माथी मारले जाते. विशेष म्हणजे दामदुप्पट किंमतीत हे साहित्य कर्जदाराला दिले जाते. ते पैसे कर्जासोबत वसुल केले जाते. त्यातून कर्जदाराची मोठी लूट होत आहे.