कोट्यवधी खर्चूनही रस्ते ‘जैसे थे’

By Admin | Updated: December 18, 2014 23:02 IST2014-12-18T23:02:48+5:302014-12-18T23:02:48+5:30

विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रस्त्यांसाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी देते. महागाव तालुक्यातील रस्त्यांच्या निर्मिती आणि देखभाल दुरुस्तीसाठी आतापर्यंत कोट्यवधीचा निधी आला.

Roads were 'like' without spending billions | कोट्यवधी खर्चूनही रस्ते ‘जैसे थे’

कोट्यवधी खर्चूनही रस्ते ‘जैसे थे’

महागाव : विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रस्त्यांसाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी देते. महागाव तालुक्यातील रस्त्यांच्या निर्मिती आणि देखभाल दुरुस्तीसाठी आतापर्यंत कोट्यवधीचा निधी आला. मात्र ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था पाहता हा निधी गेला कोठे, असा प्रश्न निर्माण होतो. ग्रामीण भागातील रस्ते उखडलेले असून या रस्त्यांवरून धड चालताही येत नाही. मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची ओरड सातत्याने होत असताना गुणवत्ता तपासणीही कागदावरच झाल्याचे दिसत आहे.
महागाव तालुका डोंगरदऱ्यात वसला आहे. अनेक गावे आडवळणावर आहे. या गावांना मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी आणि तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी आतापर्यंत दिला आहे. दरवर्षी देखभाल दुरुस्तीसाठीही निधी दिला जातो. परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून हा निधी योग्यरित्या खर्चच केला जात नाही. तालुक्यातील अनेक रस्त्यांवर खर्च झालेला निधीचा कवडीचाही फायदा जनतेला होत नाही. तालुक्याच्या मानात शिरपेच खोवणारा नागपूर-बोरी-तुळजापूर हा राज्यमार्ग होय. या राज्य मार्गावरून अहोरात्र वाहतूक सुरू असते. परंतु अनेक ठिकाणी दोन-दोन फुटाचे खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे दोन महिलांना प्राणही गमवावे लागले. मुख्य रस्त्याचीच ही अवस्था असेल तर ग्रामीण भागातील रस्त्याबाबत न बोललेलेच बरे.
सवना-वाकोडी, मुडाणा-गौळ, बिजोरा-दगडथर, वडद-बेलदरी, मुडाणा-वडद, पिंपळगाव-भांब, अनंतवाडी-कोंढा, हिवरा-बारभाईतांडा, पोखरी-कोणदरी, माळहिवरा - खडका-चिलगव्हाणसह तालुक्यातील अनेक रस्त्यांची खस्ता हालत आहे. रस्ते नूतनीकरणासाठी दरवर्षी शासनाकडून पैसा येतो. परंतु गैरप्रकारामुळे या रस्त्याचे भाग्यच उजळत नाही.
नागरिकांनाही खाचखळग्यातून जावे लागते. आता तर खाचगळ्याची या भागातील नागरिकांना सवय झाली आहे. रस्त्या गुणवत्तेबाबत नेहमी ओरड असते.
वरिष्ठांपर्यंत तक्रारी केल्या जातात. परंतु गुणवत्ता नियंत्रण विभाग केवळ थातूरमातूर दौरा करते. नमुना घेतात. नंतर मात्र काहीच होत नाही. जणू या पथकासोबत येथील कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचेच यातून दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Roads were 'like' without spending billions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.