टक्केवारीच्या गणितात रस्त्यांची चाळणी
By Admin | Updated: February 5, 2015 23:17 IST2015-02-05T23:17:34+5:302015-02-05T23:17:34+5:30
रस्ते बांधकामात टक्केवारीच्या गणिताने रस्त्यांची पूर्ती वाट लागली असून, पुसद शहराच्या चारही बाजुने रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसत आहे. पदाधिकारी, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या

टक्केवारीच्या गणितात रस्त्यांची चाळणी
पुसद : रस्ते बांधकामात टक्केवारीच्या गणिताने रस्त्यांची पूर्ती वाट लागली असून, पुसद शहराच्या चारही बाजुने रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसत आहे. पदाधिकारी, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मिलीभगतमुळे रस्ते काही दिवसातच उखडून जातात. या रस्त्यावरून चालताना वाहनधारकांना कसरत करावी लागत असून, विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे.
निवडणुकीच्या तोंडावर राज्यमार्गावरील रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु या कामात गुणवत्तेबाबत आनंदी आनंद दिसत होता. पुसद शहराबाहेरील अकोला, यवतमाळ, माहुर, नांदेड, हिंगोली या राज्य मार्गाची अक्षरश: चाळणी झाली आहे. या मार्गावरील धोकादायक खड्डे मृत्यूचे सापळे झाले आहे. या खड्ड्यांनी काहींचा बळी तर काहींना कायमचे जायबंदी केले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी अद्यापही झोपेचे सोंग घेऊन आहे.
पुसदहून यवतमाळ, नागपूर, वाशिम, अकोला, हिंगोली, नांदेडकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्याच्या मध्यभागी दोन ते तीन फुटाचे खड्डे पडले आहे. त्यामुळे चालविताना वाहन नेहमी उसळत असते, यामुळे मणक्यांची झिज होत असून, अनेकांना रुग्णालयाचा रस्ता धरावा लागतो. विशेष म्हणजे ४० ते ६० हजार किलोमीटर चालल्यानंतर खराब होणारे सस्पेंशन पुसद परिसरातील खड्ड्यांमुळे १० ते २० हजार किलोमीटरवरच खराब होत आहे. यासाठी वाहनधारकांना दुरूस्तीचा भूर्दंड पडतो.
खड्ड्यांमुळे अनेकदा इंजीनला मार बसतो. मशीनमधून आॅईल गळते, मुदतीआधीच वाहने दुरूस्तीसाठी न्यावी लागतात, शॉकपही खराब होऊन जातात.
रस्त्याची गुणवत्ता घसरण्यास ठेकेदाराऐवढेच अधिकारीही कारणीभूत आहेत. ठेकेदारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम अधिकाऱ्यांचे असते. परंतु टक्केवारीच्या गणितात अधिकारी लक्षच देत नाही. अनेकदा पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदार असतात. तेथे अधिकाऱ्यांचे
काहीच चालत नाही. पुसद तालुक्यातील राज्यमार्गांची या त्रिकुटामुळे पुरती वाट लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)