लोकवर्गणीतून करणार रस्त्याची दुरूस्ती
By Admin | Updated: June 15, 2017 01:05 IST2017-06-15T01:05:59+5:302017-06-15T01:05:59+5:30
तालुक्यातील पाटणबोरी येथील मुख्य रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली असून या रस्त्याची दुरुस्ती होणार तरी केव्हा,

लोकवर्गणीतून करणार रस्त्याची दुरूस्ती
‘प्रहार’चे अभिनव आंदोलन : पाटणबोरी येथील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : तालुक्यातील पाटणबोरी येथील मुख्य रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली असून या रस्त्याची दुरुस्ती होणार तरी केव्हा, असा प्रश्न पाटणबोरीवासियांनी उपस्थित केला आहे.या बाबत नागरिकांनी अनेकदा सबंधिताकडे तक्रारी केल्या. परंतु त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. येत्या चार दिवसांत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले नाही तर ग्राहक प्रहार संघटनेतर्फे अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. गावकऱ्यांकडूनच वर्गणी करुन या रस्त्याची दुरुस्ती ग्राहक प्रहार संघटनेतर्फे करण्यात येईल अशी माहिती प्रसाद नावलेकर यांनी दिली.
पाटणबोरी हे गाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून या गावाची लोकसंख्या जवळपास १२ हजारांच्या आसपास आहे. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या गावात जाण्यासाठी एकमुख्य रस्ता आहे. मागील कित्येक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था खराब आहे. परंतु आता तर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे खड्डयांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. या रस्त्याने ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी पाटणबोरी येथील रहिवाशांनी अनेकदा ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे लेखी निवेदन दिले. परंतु कोणीही याकडे लक्ष दिले नाही. ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्यास या रस्त्याचे काम आमच्याकडे नाही, असे सांगितले जाते. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याकडे गेले तर ते दुरुस्तीचे काम आमच्याकडे नाही, असे सांगतात.
पाटणबोरी येथील या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे पाटणबोरीवासियांमध्ये असंतोष आहे. पांढरकवडा येथील ग्राहक प्रहार संघटनेने ग्रामपंचायत पाटणबोरी, पंचायत समिती पांढरकवडा व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली असून येत्या चार दिवसांत या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा गावातील नागरिकांकडून वर्गणी गोळा करुन आम्हीच या रस्त्याची दुरुस्ती करु असा इशारा दिला आहे.