रेल्वेने अडविला शेतकऱ्यांचा रस्ता

By Admin | Updated: March 10, 2017 01:16 IST2017-03-10T01:16:11+5:302017-03-10T01:16:11+5:30

इंग्रज राजवटीपासून असलेले वडगाव रस्त्यावरील गेट बंद करून शेकडो शेतकऱ्यांचाव मार्गच रेल्वे प्रशासनाने बंद केला आहे.

Road to farmers obstructed by railways | रेल्वेने अडविला शेतकऱ्यांचा रस्ता

रेल्वेने अडविला शेतकऱ्यांचा रस्ता

इंग्रजकालीन गेट बंद : शेती करणे झाले कठीण, रस्ता पूर्ववत सुरू करण्याची मागणी
वणी : इंग्रज राजवटीपासून असलेले वडगाव रस्त्यावरील गेट बंद करून शेकडो शेतकऱ्यांचाव मार्गच रेल्वे प्रशासनाने बंद केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली शेती करणे कष्टप्राय बनले आहे. रेल्वे प्रशासनाने बंद केलेले गेट पूर्ववत सुरू करून शेतकऱ्यांना त्रासमुक्त करावे, अशी मागणी होत आहे.
नागपूर-वणी-राजूर (कॉलरी) हा रेल्वेमार्ग इंग्रज राजवटीत सुरू झाला. कोळसा व चुना या खनिजांची वाहतूक या मार्गाने केली जात होती. या रेल्वे मार्गावर वरोरा रस्ता, नांदेपेरा रस्ता व वडगाव रस्ता या ठिकाणी मानवरहित रेल्वेगेट होते. वडगाव रस्त्यावर किमी ८५६/३-४ याठिकाणी गेट क्रमांक ७ सी. होते. वणी शहरातील शेकडो शेतकऱ्यांची शेती वडगाव व रांगणा शिवारात आहे. हे सर्व शेतकरी वडगाव रस्त्यानेच रहदारी करून शेती करीत होते.
त्यानंतर वणी-आदिलाबाद हा रेल्वे मार्ग बनविण्यात आला. या रेल्वे मार्गावरून प्रवासी गाड्या सुरू झाल्या. रेल्वे प्रशासनाने मानवरहित रेल्वे गेटची संख्या कमी करण्याचे धोरण अवलंबले. यामध्ये वडगाव रस्त्यावरील गेट क्रमांक ७ सी. बंद करण्यात आले. शहरातील जनतेसाठी पर्यायी रस्ता म्हणून नांदेपेरा गेटजवळ मिळणारा उपरस्ता तयार करून दिला. मात्र हा रस्ता जनतेसाठी सात किलोमीटरचा फेरा देणारा आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांना हा रस्ता अडचणीचा ठरत आहे. शेतकऱ्यांना जनावरे घेऊन जाणे कटकटीचे बनले आहे. शेतमजुरांना शेतात नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. जनावरे जुन्याच वडगाव रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जनावरांचे अपघात घडत आहे. वणी-यवतमाळ बायपास रस्त्यावर प्रचंड रहदारी असल्याने हा मार्ग धोक्याचा बनला आहे.
म्हणूनच वडगाव रस्त्यावरील फाटक पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी करणारे निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, रेल्वेचे प्रशासन व लोकप्रतिनिधींना दिले. यावेळी नगरपरिषदेचे बांधकाम सभापती संगीता भंडारी, आरोग्य सभापती संतोष डंभारे, नगरसेवक राकेश बुग्गेवार, विवेक कोकणे, नरेंद्र भंडारी, सुधाकर मत्ते, आदी उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Road to farmers obstructed by railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.