नव्या राष्ट्रीय महामार्गाचा प्रस्ताव मंजुरीच्या वाटेवर
By Admin | Updated: November 11, 2016 02:08 IST2016-11-11T02:08:47+5:302016-11-11T02:08:47+5:30
धारणी ते करंजी हा ३१५ किलोमीटरचा नवा मार्ग प्रस्तावित आहे. त्याचा प्रस्ताव दिल्लीत पोहोचला असून मंजुरीच्या वाटेवर आहे.

नव्या राष्ट्रीय महामार्गाचा प्रस्ताव मंजुरीच्या वाटेवर
धारणी ते करंजी : ३१५ किलोमीटर लांबी, नांदगाव खंडेश्वरला उड्डाणपूल, अनेक पुलांचा समावेश
यवतमाळ : धारणी ते करंजी हा ३१५ किलोमीटरचा नवा मार्ग प्रस्तावित आहे. त्याचा प्रस्ताव दिल्लीत पोहोचला असून मंजुरीच्या वाटेवर आहे.
नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाची घोषणा झाल्यानंतर धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या धारणी ते करंजी या नव्या महामार्गाचे सर्वेक्षण केले गेले. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट या अतिदुर्गम क्षेत्रातून हा महामार्ग सुरू होणार आहे. या मार्गात परतवाडा-अचलपूर-अमरावती-बडनेरा-नांदगाव खंडेश्वर-नेर-यवतमाळ-जोडमोहा-रुंझा-मोहदा-करंजी ही प्रमुख गावे राहणार आहेत. मध्यप्रदेशातून येणारी वाहतूक चंद्रपूर तसेच तेलंगणा-हैदराबादकडे वळविण्यासाठी या मार्गाचा उपयोग होणार आहे. या मध्यमातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ व ७ जोडला जाणार आहे. ३१५ किलोमीटरच्या या महामार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मागासक्षेत्र, पर्यटन क्षेत्र, धार्मिक क्षेत्र या महामार्गाद्वारे जोडले जाईल. सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या महामार्गाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाकडे पाठविण्यात आला आहे. आगामी दोन आठवड्यात या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर या मार्गाचे भूसंपादन प्रारंभ होणार आहे.
धारणी ते करंजी या महामार्गावर नांदगाव खंडेश्वर व अन्य काही ठिकाणी उड्डान पूल उभारले जाणार आहे. प्रमुख गावांमधून बायपास काढण्यात आला आहे. नेरमध्ये यवतमाळकडे येताना डाव्या हातावरून बायपास काढावा यासाठी राजकीय दबाव होता. परंतु सर्वेक्षण करणाऱ्या प्राधिकृत यंत्रणेने हा दबाव झुगारुन नेरच्या उजव्या बाजूने हा बायपास ‘ओके’ केला. डाव्या बाजूने बायपाससाठी राजकीय इच्छाशक्ती असली तरी या यंत्रणेने मात्र तो ‘फिजीबल’ नसल्याचे म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
‘बायपास’चे १६ नोव्हेंबरला सादरीकरण
धारणी ते करंजी या ३१५ किलोमीटरच्या महामार्गात अनेक ठिकाणी बायपास येणार आहे. काही ठिकाणी उड्डान पूल उभारावे लागणार आहे. या बायपास व पुलांबाबत नॅशनल हायवेचे प्रादेशिक प्रमुख चंद्रशेखर यांच्यापुढे १६ नोव्हेंबर रोजी सादरीकरण होणार आहे. नेरमधील बायपासबाबत अलिकडेच लोकप्रतिनिधी व प्रशासनाची संयुक्त बैठक झाली होती. नेर ते यवतमाळ मार्गावर उजव्या बाजूनेच बायपास कसा योग्य आहे, हे पटवून दिले गेले होते. १६ नोव्हेंबरच्या सादरीकरणात या महामार्गावरील बायपास व उड्डान पुलाबाबत चंद्रशेखर यांची मोहर उमटणार आहे.