कोरोनामुक्त झालेल्या बालकांना ‘एमएसआयसी’ आजाराचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST2021-06-26T05:00:00+5:302021-06-26T05:00:02+5:30
कोरोनातून सावरलेल्या बालकांना एमएसआयसी आजाराचा धोका होतो. यामध्ये मुलांना खूप ताप येतो. पाच दिवसांपर्यंत हा ताप कमी होत नाही. मुलांचे डोळे लाल होतात. त्वचेवर रॅशेस पडतात. लहान मुलांना मळमळ होते, उलट्या होतात. याशिवाय सतत पोट दुखते. अशा स्वरूपाच्या लक्षणांना एमएसआयसी असे म्हणतात. अशा प्रकारची लक्षणे दिसताच डाॅक्टरांशी संपर्क साधून पुढील उपचारासाठी पालकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

कोरोनामुक्त झालेल्या बालकांना ‘एमएसआयसी’ आजाराचा धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचा निर्वाळा आरोग्य यंत्रणेने दिला आहे. जिल्ह्यात सहा बालकांना कोरोना झाल्याचे निदान आरोग्य यंत्रणेने केले आहे. या बालकांवर उपचार झाल्यानंतर सुटी देण्यात आली आहे. सध्या अशा स्वरूपाचे रुग्ण जिल्ह्यात नाहीत. मात्र, प्रत्येक पालकाला खबरदारी घ्यावी लागणार आहे.
कोरोनातून सावरलेल्या बालकांना एमएसआयसी आजाराचा धोका होतो. यामध्ये मुलांना खूप ताप येतो. पाच दिवसांपर्यंत हा ताप कमी होत नाही. मुलांचे डोळे लाल होतात. त्वचेवर रॅशेस पडतात. लहान मुलांना मळमळ होते, उलट्या होतात. याशिवाय सतत पोट दुखते. अशा स्वरूपाच्या लक्षणांना एमएसआयसी असे म्हणतात. अशा प्रकारची लक्षणे दिसताच डाॅक्टरांशी संपर्क साधून पुढील उपचारासाठी पालकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
पावसाळ्याच्या दिवसात सर्दी, खोकला या स्वरुपाचे आजार लहान मुलांना जाणवतात. अशा स्वरुपाची लक्षणे दिसताच बालकांना डाॅक्टरांकडे दाखवावे, यामुळे पुढील उपचार सुलभ होण्यास मदत होते.
जिल्ह्यात सहा बालकांना कोरोना
कोरोना झाल्यानंतर निगेटिव्ह झालेले बालक वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार करून सुटी देण्यात आली. आतापर्यंत सहा बालकांची नोंद झाली.
ही घ्या काळजी
लहान मुलांना शक्यतो बाहेर घेऊन जाऊ नये. बाहेर जाताना मास्क लावूनच बाहेर पडावे, याची खबरदारी पालकांनी घ्यावी.
लक्षणे दिसताच तातडीने डाॅक्टरांना दाखवावे. यामुळे मुलांवर उपचार करणे सोपे होईल आणि पुढील त्रास टाळता येईल.
लहान मुलांना कोरोनाची बाधा मुख्यत: मोठ्या व्यक्तींकडूनच होते. यामुळे घरातील मोठ्या व्यक्तींनी कोरोना नियमांचे पालन करावे. आपल्या मुलांना सुरक्षित ठेवावे.
लहान बालकांसाठी शंभर बेडची व्यवस्था
तिसऱ्या लाटेत लहान बालकांना कोरोना होण्याचा धोका आहे. हा धोका लक्षात येता स्त्री रुग्णालयात ४० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, तर तीन उपजिल्हा रुग्णालयात ६० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
- डाॅ. तरंगतुषार वारे, जिल्हा शल्यचिकित्सक, यवतमाळ