पावसाच्या दडीने पिके धोक्यात
By Admin | Updated: August 14, 2014 00:08 IST2014-08-14T00:08:23+5:302014-08-14T00:08:23+5:30
दुबार, तिबार पेरणीने हवालदिल झालेल्या बळीराजापुढे आता पावसाच्या दडीमुळे पिके धोक्यात येण्याचे संकट निर्माण झाले आहे. जमीन कडक आल्याने कोवळी रोपं जगवायची कशी हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

पावसाच्या दडीने पिके धोक्यात
निश्चल गौर - डोंगरखर्डा
दुबार, तिबार पेरणीने हवालदिल झालेल्या बळीराजापुढे आता पावसाच्या दडीमुळे पिके धोक्यात येण्याचे संकट निर्माण झाले आहे. जमीन कडक आल्याने कोवळी रोपं जगवायची कशी हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. दोन पेरण्यांसाठी झालेल्या अवाढव्य खर्चामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
यावर्षी निसर्गाची अवकृपा सातत्याने सुरू आहे. सुरुवातीला दोनही नक्षत्रात पावसाने दडी मारली. थोड्या फार प्रमाणात झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र १५ ते २० दिवसपर्यंत पावसाचा थेंबही न आल्याने बियाणे जमिनीतच गाडली गेली. यासाठी बँकांकडून घेतलेले कर्ज अंगावर बसले. यातूनही सावरत खासगी सावकार किंवा इतर ठिकाणाहून पैशाची जुळवाजुळव करत दुबार पेरणी केली. आता गेली काही दिवसांपासून पावसाने डोळे वटारले आहे.
परिसराच्या नांझा, डोंगरखर्डा, मेटीखेडा, जोडमोहा आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी कपाशी आणि सोयाबीनचे पीक घेतले आहे. काही शेतकऱ्यांना तिबार पेरणीही करावी लागली. वेळोवेळी पेरण्या उलटल्याने खर्चाची बाजू कमकुवत होत गेली. आताही पावसाची कुठलीही चिन्हे दिसत नाही. रोपं माना टाकत आहे. जमीन कडक आल्याने रोपाच्या मुळा सोकत चालल्या आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकणार आहे.
हीच परिस्थिती राहिल्यास पहिल्या पेरणीसाठी घेतलेले बँकेचे कर्ज, दुसऱ्या पेरणीसाठी सावकारांकडून घेतलेली कर्जाऊ रक्कम आणि वर्षभराचा गाडा चालवायचा कसा याची चिंता आतापासूनच शेतकऱ्यांना लागली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, त्यांनी पिके वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र पाऊस कमी झाल्याने शेतातील जलस्रोतही फार काळ टिकेल याची शास्वती नाही. गतवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवूनही पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे अनेकांनी यावर्षी पीक विम्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. आता उन्हामुळे पिके होरपळत आहे. गतवर्षीचा पीक विमा त्वरित लागू करून वाटप करावा आणि यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.