उमरखेडवर रिपाइं(ए)चा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:29+5:30

उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. हा मतदारसंघ युतीमध्ये भाजपच्या वाट्याला आहे. युतीत सहभागी रिपाईने उमरखेडची मागणी केली. रिपाइंजवळ तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे आता भाजपने चिन्ह आमचे, उमेदवार तुमचा, असा नवा फार्मुला दिल्याचे सांगितले जात आहे.

Ripai (A) claim on Umarkhed | उमरखेडवर रिपाइं(ए)चा दावा

उमरखेडवर रिपाइं(ए)चा दावा

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : युतीत विचारमंथन, जागा सोडण्यावर खल

संजय भगत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. हा मतदारसंघ युतीमध्ये भाजपच्या वाट्याला आहे. युतीत सहभागी रिपाईने उमरखेडची मागणी केली. रिपाइंजवळ तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे आता भाजपने चिन्ह आमचे, उमेदवार तुमचा, असा नवा फार्मुला दिल्याचे सांगितले जात आहे.
युतीमध्ये उमरखेडची जागा रिपाइंने (आठवले गट) मागितली आहे. मात्र भाजपने रिपाइंच्या उमेदवाराने आपल्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी अट घातली आहे. त्यामुळे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवायची की नाही, याबाबत विचारमंथन सुरू आहे. रिपाइंने मात्र अद्याप होकार दिला नाही. रिपाइंने होकार दिल्यास चिन्ह भाजपचे अन् उमेदवार रिपाइंचा, असा आगळावेळा उमेदवार येथे राहण्याचे संकेत आहे.
रिपाइंने ज्या इच्छुकाला उमेदवारी देऊ केली, त्या उमेदवाराने नुकताच मतदारसंघाचा फेरफटका मारला. भाजपातील ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे मत जाणून घेतले. विद्यमानांवर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी रिपाइंच्या इच्छुकाला सहकार्य करण्याचा शब्द दिला आहे.
रिपाइंचे कार्यकर्ते काय म्हणतात, याचीही चाचपणी पक्ष स्तरावरून सुरू आहे. कोणत्याही स्थितीत रिपाइंनेच लढावे, असे अनेकांना वाटत आहे. पक्ष चिन्हाचे काय घेऊन बसलात, त्यापेक्षा आपली माणसं वाढवा, असा संदेशही रिपाइंकडून इच्छुकाला देण्यात आला आहे. चिन्ह कोणते आहे हे महत्त्वाचे नसून आपली माणसे विधानसभेत गेली पाहिजे, हा विचारही अनेकांनी इच्छुकाला बोलून दाखविला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही मत घेतले जाणून
युतीत सहभागी रिपाइं उमरखेड विधानसभा मतदारसंघाकरिता उत्सुक आहे. विदर्भातील चारपैकी उमरखेडवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. संभाव्य इच्छुकाचा बायोडाटा भाजप प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात आला आहे. त्याबाबत राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यात आले आहे. त्यामुळे या मतदारसंघात चिन्ह आमचे, माणूस तुमचा, अशी स्थिती राहण्याचे संकेत आहे.

Web Title: Ripai (A) claim on Umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.