मेडिकलमध्ये स्वीय प्रपंच खात्याच्या निधीला सुरूंग
By Admin | Updated: April 25, 2015 02:00 IST2015-04-25T02:00:01+5:302015-04-25T02:00:01+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता स्वीय प्रपंच खात्याच्या निधीला सुरूंग लावण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे.

मेडिकलमध्ये स्वीय प्रपंच खात्याच्या निधीला सुरूंग
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता स्वीय प्रपंच खात्याच्या निधीला सुरूंग लावण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. पाच लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी हा कारभार केला आहे. या कर्मचाऱ्यांवर रुग्णालय प्रशासनाकडून कुठल्याही स्वरुपाची अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही.
रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांकडून विविध चाचण्यांसाठी शुल्क घेण्यात येते. एक्सरे, सोनोग्राफी, सीटीस्कॅन, पॅथॉलॉजीतील विविध तपासण्या अतिशय माफक दरात केल्या जातात. गरीब रुग्णांसाठी तर दारिद्र्यरेषाकार्ड दाखविल्यास सुट दिली जाते. याही उपर सेवाशुल्काच्या पावत्याच कमी रकमेच्या फाडून मोठा अपहार झाला आहे. याची वाच्यता होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्यासाठी पाच लिपिक पुढे सर्सावले आहे. त्यांनी आपलेच समाज बांधव असलेल्या राजकीय पुढाऱ्याच्या माध्यमातून हा अपहार मॅनेज करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे.
रुग्णांकडून मिळणारे सेवाशुल्क रुग्णालयाच्या स्वीय प्रपंच खात्यात (पीएलए) मध्ये जमा होते. ही रक्कम रुग्णालयाच्या उत्पन्नातून आलेली असते. याचा अधिकारही रुग्णालय प्रशासनाकडेच असतो. त्यातून कुठलीही कामे करता येतात, मात्र अतिशय कमी प्रमाणात जमा होणाऱ्या या रक्कमेकडे फारसे लक्षच दिले जात नाही. याचाच फायदा घेऊन काहींनी पीएलएचा निधी हडपण्यास सुरूवात केली. २०१४-१५ या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे वरकरणी दिसत आहे. याची सखोल चौकशी झाल्यास आणखी मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. मात्र हे प्रकरण प्रशासनस्तरावर पद्धतशीरपणे निकाली काढावे असाही प्रयत्न रुग्णालय प्रशासनातील एका गटाकडून होत आहे.
शिवाय यासाठी राजकीय पुढाऱ्यांचीसुद्धा मदत घेतली जात आहे. आता या प्रकरणाचा अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड कसा छडा लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)