पुरस्काराची रक्कम आत्महत्याग्रस्त कुटुंबाला
By Admin | Updated: June 2, 2017 01:46 IST2017-06-02T01:46:26+5:302017-06-02T01:46:26+5:30
शेतकरी आत्महत्यांनी व्यथित झालेल्या एका शिक्षिकेने आपल्याला मिळालेल्या पुरस्काराची २५ हजारांची

पुरस्काराची रक्कम आत्महत्याग्रस्त कुटुंबाला
रूपाताई मानकर यांचा आदर्श : रामदास आठवले यांच्या हस्ते दिला मदतीचा धनादेश
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकरी आत्महत्यांनी व्यथित झालेल्या एका शिक्षिकेने आपल्याला मिळालेल्या पुरस्काराची २५ हजारांची रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला देऊन समाजात नवा आदर्श निर्माण केला. दिग्रस तालुक्यातील हरसूलच्या रूपाताई मानकर यांनी पुरस्काराचे २५ हजार रुपये नेर तालुक्यातील मारवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते हा मदतीचा धनादेश रविवारी प्रदान करण्यात आला.
दिग्रस तालुक्यातील हरसूल येथील शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका पुष्पा उपाख्य रूपाताई नागसेन मानकर यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोल्हापूरच्या संस्थेने २५ हजारांचा पुरस्कार देऊन गौरव केला. हा पुरस्कार स्वीकारतानाच त्यांनी आपल्याला मिळालेली पुरस्काराची रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला होता. शैक्षणिक क्षेत्रात आदर्श निर्माण करणाऱ्या रूपातार्इंनी शेतकऱ्यांचे दु:ख जवळून अनुभवले आहे. त्यामुळेच त्यांनी ही रक्कम देण्याचा निर्णय घेतला. नेर तालुक्यातील मारवाडी येथील तरुण शेतकरी विशाल पवार याने आत्महत्या केली होती. त्याची पत्नी माया माहेरी राहते. आर्थिक विवंचनेत असलेल्या या परिवाराला ही मदत करण्याचा निर्णय रूपातार्इंनी घेतला.
दरम्यान नेर येथे एका कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आले असता पुरस्काराची रक्कम त्यांच्या हस्ते माया पवार यांना देण्यात आली. यावेळी रूपाताई मानकर, महेंद्र मानकर, संतोष अरसोड, मोहन भोयर, निखिल जैत, गोपाल चव्हाण, गौरव नाईकर, प्रणय बोबडे, नवनीत महाजन आदी उपस्थित होते.