रिव्हॉल्व्हर, काडतुसे गायब
By Admin | Updated: May 16, 2015 00:19 IST2015-05-16T00:19:55+5:302015-05-16T00:19:55+5:30
वडगाव रोड पोलीस ठाण्याचा संपूर्ण मालखानाच पोखरलेला असून तेथून जप्तीतील रिव्हॉल्व्हर आणि काडतुसेही गायब ...

रिव्हॉल्व्हर, काडतुसे गायब
ठाणेदारांनीच दडपल्या चोऱ्या : वडगाव रोड ठाण्याचा मालखानाच पोखरलेला
यवतमाळ : वडगाव रोड पोलीस ठाण्याचा संपूर्ण मालखानाच पोखरलेला असून तेथून जप्तीतील रिव्हॉल्व्हर आणि काडतुसेही गायब असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. दरम्यान, ४१ लाख ६६ हजाराच्या चोरीतील आरोपी निर्मल राठोड याला न्यायालयाने २० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
काही दिवसांपूर्वी हवालातील जप्त रक्कम वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या मालखान्यात ठेवण्यात आली होती. मात्र या मालखान्याचा रक्षक असलेल्या पोलीस शिपाई निर्मलनेच या रकमेवर हात मारला. हा गुन्हा सुरुवातीला दडपण्याचाही प्रयत्न झाला. या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या गुन्ह्यातील ३९ लाख रुपयांची रक्कम जप्त झाली आहे. त्याच्याकडून आणखी ३ लाख ५२ हजार रुपये जप्त करायचे आहे. त्यासाठी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे.
या चोरीत निर्मलचे आणखी काही मित्र सहभागी असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. खरोखरच आणखी कुणाचा हात, पडद्यामागून पाठबळ आहे का याची शोध मोहीम स्थानिक गुन्हे शाखेमार्फत केली जात आहे. विशेष असे निर्मलने यापूर्वीही याच मालखान्यातून मोबाईल, मोटरसायकल चोरली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ठाणेदारांनी वरिष्ठांना माहिती देऊन त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. किमान त्याला मालखान्याच्या जबाबदारीतून मुक्त करून त्याची इतरत्र नियुक्ती करणे आवश्यक होते.
मात्र प्रत्यक्षात असे काहीही न करता ठाणेदारांनी चोरीतील मालाची रक्कम भरुन घेऊन निर्मलला पुन्हा त्याच जागी ठेवले. त्यामुळेच वरिष्ठ पाठीशी आहे, असा समज होऊन निर्मलची हिंमत वाढली आणि त्याने थेट ४२ लाखांच्या रोकडवरच हात मारला. या मालखान्यात अशा अनेक भानगडी असल्याचे सांगितले जाते. तेथून रिव्हॉल्व्हर , काडतूस व अन्य साहित्य बेपत्ता असल्याची माहिती आहे. या मालखान्याचा हिशेब जुळविण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
४३ लाखांची रोकड ट्रेझरीत का नाही ?
या मालखान्याची सखोल तपासणी झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता पोलीस खात्यातूनच वर्तविली जात आहे. हवालाच्या या रकमेबाबतही पोलीस दलात बरीच चर्चा आहे. रक्कम परत देण्यास टाळाटाळ करणे, न्यायालयात ‘से’ देताना अडवणूक करणे असे प्रकार घडले आहेत. एवढी मोठी रक्कम पोलीस ठाण्याच्या मालखान्यात ठेवलीच कशी हा मुख्य प्रश्न आहे. वास्तविक ही रक्कम शासनाच्या तिजोरीत अथवा पोेलीस अधीक्षक कार्यालयाच्या कॅश रुममध्ये, ट्रेझरीत ठेवणे अपेक्षित होते. मात्र ती मालखान्यात ठेवण्यामागे चांगला हेतू नसल्याचे बोलले जाते. पोलीस ठाण्यांचे दरवर्षीच वरिष्ठांकडून वार्षिक निरीक्षण केले जाते. या निरीक्षणादरम्यान मालखान्यातील गैरप्रकार उघड का होत नाही, असाही सवाल आहे. जिल्ह्यात वणी विभागातील आणखी एका पोलीस ठाण्याच्या मालखान्यात असाच गोंधळ असल्याचेही बोलले जाते.