सचिवांनी घेतला विविध विभागांचा आढावा

By Admin | Updated: June 20, 2015 00:18 IST2015-06-20T00:18:01+5:302015-06-20T00:18:01+5:30

राज्याचे जलसंधारण व रोहयोचे प्रधान सचिव तथा उपविभागाचे पालक सचिव प्रभाकर देशमुख यांनी शुक्रवारी विविध विभागांची आढावा बैठक घेतली.

A review of the various departments taken by the Secretaries | सचिवांनी घेतला विविध विभागांचा आढावा

सचिवांनी घेतला विविध विभागांचा आढावा

कृषीचा गलथान कारभार : सरपंचांनी मांडल्या व्यथा, दर दोन महिन्यांनी बैठक
पांढरकवडा : राज्याचे जलसंधारण व रोहयोचे प्रधान सचिव तथा उपविभागाचे पालक सचिव प्रभाकर देशमुख यांनी शुक्रवारी विविध विभागांची आढावा बैठक घेतली. येथील शहीद नागेश्वर जिड्डेवार सभागृहात ही बैठक पार पडली. त्यात विविध समस्यांचा उहापोह झाला.
बैठकीत त्यांनी प्रशासन व गावकऱ्यांच्या सहकार्याने १०० टक्के पेरणी करण्याचे आवाहन केले. आत्महत्याग्रस्त कुटुंब, गरजू गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांना मदतीकरिता गावामध्ये सरपंचांनी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी समिती स्थापन करून गरजू लोकांची यादी तयार करावी, ती यादी शासनाकडे सादर करावी, असे निर्देश दिले. या यादीतील लोकांना शासन नक्कीच मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या बैठकीला जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, कृषी विभागाचे गायकवाड यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी तथा झरीजामणी व केळापूर तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी, बँकेचे अधिकारी उपस्थित होते. सर्वप्रथम पालक सचिवांनी आढावा सभेचे कारण विषद करून १०० टक्के पेरणी करण्याकरिता सर्व सरपंच, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व गावकऱ्यांनी गरजू आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पेरणी करण्यास मदत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर सरपंच, तलाठी व ग्रामस्थांनी एक समिती स्थापन करावी, त्या समितीने गावामधील आत्महत्याग्रस्त, गरीब, गरजू अशा १० लोकांच्या नावाची यादी प्रशासनाला द्यावी, प्रशासन अशा लोकांना मदत करेल, असे आश्वासन दिले. कृषी विभागाकडून अशा १० लोकांना योग्य योजना पुरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यानंतर सरपंचांनी आपल्या समस्या मांडण्यास सुरूवात केली. त्यात अनेक सरपंचांनी कृषी विभागाच्या गलथान कारभाराचा मुद्दा उपस्थित केला. उपविभागात कृषी विभागाने जलयुक्त शिवार योजना फक्त कंत्राटदारांच्या लाभाची केली असून यामध्ये तांत्रिकदृष्ट्या अनेक ठिकाणचे बंधारे हे योग्यरित्या बांधले गेले नसल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विभाग ज्या वस्तूंची गरज नाही, त्या वस्तू उपलब्ध करून देतात व ज्या वस्तूंची गरज आहे, त्या वस्तू कधीच देत नाही, असाह आरोप केला. कृषी विभागात साहित्यासाठी अनेक चकरा माराव्या लागतात, अशा तक्रारी सचिव व जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी यापुढे अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवले जाईल, तसेच सदर तक्रारींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. घोन्सी कोलाम पोड येथील फ्लोराईडयुक्त पाण्याचा मुद्दा उपसरपंचानी उपस्थित केला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर गावात ठक्कर बाप्पा योजनेचा प्रस्ताव पाठवा, मी लगेच मंजूर करून देतो, असे सांगितले. दर दोन महिन्यात जिल्हाधिकारी स्वत: पीओसह पंचायत समितीचा आढावा घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (शहर प्रतिनिधी)

ग्रामस्थांना सक्षम करण्यावर भर- जिल्हाधिकारी
ग्रामस्थांना सक्षम करण्यावर आमचा भर असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विधवा, आत्महत्याग्रस्त, वयोवृद्ध व्यक्तींचे प्रस्ताव त्वरित तलाठ्यांनी पाठवावे, असे निर्देश त्यांनी दिले. विहिरी आहे, परंतु अनेक वर्षांपासून वीज जोडणी मिळाली नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. त्यावर वीज अधिकाऱ्यांनी त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील तीन हजार आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सर्व्हेक्षण सुरू असून अपात्र ठरलेल्या कुटुंबांना विशेष भाग म्हणून शासनातर्फे मदत केली जाईल, असेही ते म्हणाले. शौचालय बांधण्यासाठी पाच कोटींचा निधी देण्याचे डॉ.कलशेट्टी यांनी सांगितले. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना दोन दिवसात उपलब्ध करून देण्याचे निर्देश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Web Title: A review of the various departments taken by the Secretaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.