जिल्हा परिषदेत दिवसभर आढावा
By Admin | Updated: October 26, 2016 00:39 IST2016-10-26T00:39:04+5:302016-10-26T00:39:04+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला यांनी मंगळवारी दिवसर आढावा बैठक घेतली.

जिल्हा परिषदेत दिवसभर आढावा
अधिकारी व्यस्त : विभागीय आयुक्तांच्या निर्देशानंतर प्रशासन गतिमान करण्याचा प्रयत्न
यवतमाळ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला यांनी मंगळवारी दिवसर आढावा बैठक घेतली. या बैठकीत अधिकारी, विभाग प्रमुख व्यस्त असताना सर्वच विभागातील कर्मचारी सुस्तावल्याचे दिसून आले.
विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी गेल्या रविवारी १६ आॅक्टोबरला जिल्हा परिषद सभागृहात आढावा बैठक घेतली होती. बैठकीत त्यांनी प्रशासन गतीमान करण्याचे निर्देेश दिले होते. काही विभागांच्या कामाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. आयुक्तांनी जलयुक्त शिवार, सिंचन विहिरी, शेततळे, प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, पारधी आवास व शबरी आवास योजना, विभागीय चौकशी प्रकरणे, निलंबन, गैरहजेरी, अखर्चीत निधी, आश्रमशाळा, बालमृत्यू, सर्व्हीस बुक अद्यवतीकरण, सेवानिवृत्तांच्या प्रलंबित पेन्शन केस आदींचा आढावा घेतला होता.
या आढावा बैठकीनंतर त्यांनी काही विभागांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. प्रशासन गतीमान करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याला अनुसरून मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विभाग प्रमुखांकडून अद्ययावत माहिती जाणून घेतली. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे आज दिवसभर सीईओंच्या कक्षासमोर अधिकारी, विभाग प्रमुख, कर्मचाऱ्यांची वर्दळ होती. अनेक अधिकारी फाईली घेऊन ताटकळत दिसत होते.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अखर्चित निधीबाबात माहिती जाणून घेतली. कोणत्या योजनांवर आत्तापर्यंत नेमका किती खर्च झाला. अद्याप किती खर्च बाकी आहे. आचारसंहिता काळात निधी खर्च करताना कोणती काळजी घ्यावी, आदींबाबत त्यांनी निर्देशही दिले. नगरपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रथमच ही आढावा बैठक झाली. आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानंतर झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
कर्मचारी साडी खरेदीत गुंग
सीईओंकडे आढावा बैठक सुरू असतानाच जिल्हा परिषद वास्तूत एक साडी विक्रेता शिरला. त्याने जवळपास प्रत्येक विभाग पालथा घातला. दुसऱ्या मजल्यावरील पाणी पुरवठा विभागात तर त्याच्याभोवती सर्व कर्मचारी गोळा झालेले आढळले. तो विक्रेता त्यांना साडी खरेदीची गळ घालत होता. काही महिला कर्मचारी साडी न्याहाळत होत्या. यात पुरूष कर्मचारीही मागे नव्हते. त्यांचीही साडी खरेदी करण्यासाठी भावबाजी सुरू होती. विशेष म्हणजे कार्यालयीन वेळात ही साडी खरेदी-विक्री सुरू होती. आढावा बैठकीमुळे सर्वच विभागातील कर्मचारी सुस्तावल्याचे दिसून आले.