सचिव घेणार उपविभागांचा आढावा
By Admin | Updated: May 15, 2015 02:19 IST2015-05-15T02:19:05+5:302015-05-15T02:19:05+5:30
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी थेट महसूल उपविभागातच सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सचिव घेणार उपविभागांचा आढावा
यवतमाळ : शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी थेट महसूल उपविभागातच सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि शासकीय योजनांची स्थिती, त्यातील उणिवा या अभ्यासण्यासाठी राज्य शासनाचे सचिव महसूल उपविभागात काम करणार आहेत. त्याच अनुषंगाने शुक्रवारी दारव्हा, केळापूर, राळेगाव येथे नियुक्त सचिवांनी आढावा बैठक आयोजित केली आहे.
ग्रामविकास विभागाचे सचिव व्ही. गिरीराज यांच्याकडे दारव्हा उपविभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी दारव्हा येथे बैठक बोलाविली आहे. केळापूर येथे सचिव प्रभाकर देशमुख आणि राळेगाव येथे सचिव विकास खारगे हे बैठक घेणार आहेत. थेट सचिव उपविभागातील कामकाजाचा आढावा घेणार असल्याने अधिनस्थ यंत्रणाही दबावात आली आहे. महसूलासोबतच उपविभागातील सर्वच शासकीय कार्यालयाची झाडाझडती आणि त्यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या शेतकरी उपयोगी विविध योजना, त्यांची स्थिती, शेतकरी आत्महत्येची कारणे, आत्महत्या थांबविण्यास शासन कोठे कमी पडते याचाही सर्वांगिण अभ्यास केला जाणार आहे.
त्यानुसार उपविभागातील शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रत्येक सचिवाकडून उपाययोजना सुचविल्या जातील. या आधारेच शासन शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी योजना आखण्याच्या तयारीत आहे. दरम्यान उपविभागातील महसूल व इतर सबंधित अधिकारी, कर्मचारी चांगलेच दबावात आले आहेत. त्यातही उपविभागातील कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांना या आढावा बैठकीचा चांगलाच धसका बसलेला दिसून येत आहे.
(कार्यालय प्रतिनिधी)