मुख्यमंत्र्यांपूर्वी पालकसचिवांकडून आढावा
By Admin | Updated: November 18, 2014 23:03 IST2014-11-18T23:03:06+5:302014-11-18T23:03:06+5:30
पश्चिम विदर्भातील खरीप पीक परिस्थितीचा आढावा शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत घेणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी जिल्ह्याचे पालकसचिव व्ही.गिरीराज यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून

मुख्यमंत्र्यांपूर्वी पालकसचिवांकडून आढावा
विकास योजनांवर चर्चा : जिल्हा परिषदेतही घेतली तब्बल दोन तास बैठक
यवतमाळ : पश्चिम विदर्भातील खरीप पीक परिस्थितीचा आढावा शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत घेणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी जिल्ह्याचे पालकसचिव व्ही.गिरीराज यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थिती जाणून घेतली.
ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असलेले व्ही. गिरीराज जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. रबी व उन्हाळी ओलितासाठी धरणाच्या पाण्याचे नियोजन करण्यास सांगितले.
जिल्ह्यात भीषण पाणी आणि चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता या बैठकीत वर्तविण्यात आली. जिल्ह्यात ७ लाख ७८ हजार पशुधन आहे. त्यांना जुलै महिन्यापर्यंत १५ लाख १३ हजार मेट्रीक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. खरिप - रबी आणि पडिक, जंगल क्षेत्रातून चारा उपलब्ध झाल्यानंतरही तब्बल एक लाख ३१ हजार मेट्रीक टन चाऱ्याची तूट भासणार आहे. अशा स्थितीत प्रशासनाकडून व्यवस्था केली जावी असा प्रस्ताव पालक सचिवासमोर ठेवण्यात आला. त्यानंतर जिल्हा कृषी अधिक्षक आणि कृषी विस्तार अधिकाऱ्यांकडून पीक स्थिती जाणून घेतली. सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरू करावेत अशी मागणी करण्यात आली. रबीच्या पेरणीसाठी बियाणे आणि पाण्याची उलब्धता याचीही आकडेवारी सचिवांनी घेतली. त्यानंतर नगरपरिषद, ग्रामपंचायत क्षेत्रातील पाणी टंचाईचा आणि त्यावर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. धडक सिंचन योजनेतून मंजूर झालेल्या विहीर वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश दिले. ही योजना रोजगार हमी आणि जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येते. धडक सिंचनच्या विहीर बांधकामाला प्राधन्य देण्यास व्ही. गिरीराज यांनी सांगितले.
शनिवारी खरीप आढावा बैठक होत आहे. विभागात बहुतांश गावात आणेवारी ५० टक्क्याच्या आत आहे. दुष्काळी परिस्थिीतीच्या उपाययोजना व बैठकीच्या तयारीच्या दृष्टीने अधिकारी अपडेट होत आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)