मीना बाजारमध्ये महसूल अधिकाऱ्याची भागीदारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 06:00 IST2020-03-07T06:00:00+5:302020-03-07T06:00:26+5:30
आझाद मैदानात गेल्या अनेक वर्षांपासून मीना बाजार भरविला जातो. परंतु विशिष्ट व्यक्तींनाच त्याचे कंत्राट मिळतात. नाममात्र रकमेत दोन महिन्यांसाठी ही जागा किरायाने घेतली जाते. वास्तविक या बाजारातून लाखो रुपयांची कमाई केली जाते. प्रत्येक वर्षी ठरलेल्या व्यक्तींनाच मीना बाजार कसा काय मिळतो याच्या खोलात शिरले असता महसूल अधिकाºयाच्या अघोषित भागीदारीचे ‘पित्तर’ उघडे पडले.

मीना बाजारमध्ये महसूल अधिकाऱ्याची भागीदारी !
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील आझाद मैदानात गेल्या अनेक वर्षांपासून थाटल्या जाणाऱ्या मीना बाजारात चक्क एका महसूल अधिकाºयाचीच भागीदारी असल्याचा खळबळजनक प्रकार चर्चिला जात आहे. हा अधिकारी अलिकडेच सेवानिवृत्त झाला असला तरी आपल्या मर्जीतील कंत्राटदारांनाच मीना बाजार मिळावा म्हणून अजूनही स्थानिक महसूल अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचे बोलले जाते.
आझाद मैदानात गेल्या अनेक वर्षांपासून मीना बाजार भरविला जातो. परंतु विशिष्ट व्यक्तींनाच त्याचे कंत्राट मिळतात. नाममात्र रकमेत दोन महिन्यांसाठी ही जागा किरायाने घेतली जाते. वास्तविक या बाजारातून लाखो रुपयांची कमाई केली जाते. प्रत्येक वर्षी ठरलेल्या व्यक्तींनाच मीना बाजार कसा काय मिळतो याच्या खोलात शिरले असता महसूल अधिकाºयाच्या अघोषित भागीदारीचे ‘पित्तर’ उघडे पडले.
हा अधिकारी अनेक वर्ष जिल्ह्यात वेगवेगळ्या पदावर कार्यरत होता. काही वर्षांपूर्वी त्यांची अन्य जिल्ह्यात बदली झाली. तेथूनच ते सेवानिवृत्त झाले. स्थानिक प्रशासनाची दिशाभूल करून आतापर्यंत त्यांच्या मर्जीतील व्यक्तीला मीना बाजारचे कंत्राट मिळवून देण्यात त्यांना यश येत होते. जिल्ह्याबाहेर गेल्यानंतरही त्यांचा हा पराक्रम सुरूच होता. आता सेवानिवृत्त झाल्यानंतरही ते आपले प्रशासकीय वजन महसूलच्या स्थानिक अधिकाऱ्यावर फोनद्वारे वापरत असल्याचे सांगितले जाते. आजही त्यांचा आपल्या मर्जीतील ठरलेल्या व्यक्तींनाच मीना बाजारचा कंत्राट मिळावा यासाठी आग्रह आहे. परंतु यवतमाळचे उपविभागीय महसूल अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन मीना बाजारसाठी आझाद मैदान जाहीर लिलाव करून किरायाने देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. या प्रस्तावामुळे शासनाच्या महसुलात लाखो रुपयांची भर पडणार आहे. आतापर्यंत हा महसूल मीना बाजाराचे कंत्राट घेणाºयांच्या तिजोरीत जात होता. नफ्यातील या रकमेत त्या महसूल अधिकाऱ्यासह अनेक जण ‘वाटेकरी’ होते.
धमकी दिल्याचीही चर्चा
गेल्या अनेक वर्षांपासून मर्जीतील व्यक्तींना मीना बाजारसाठी आझाद मैदान मिळावे म्हणून प्रशासकीय वजन वापरणाºया त्या महसूल अधिकाºयाला कुणी तरी धमकी दिल्याची चर्चा आहे. तुम्ही सेवानिवृत्त झाले, आझाद मैदान प्रकरणात आता हस्तक्षेप करू नये, अधिकारी बनूनच रहावे अशी समज दिली गेल्याचेही बोलले जाते. धमकी देणारा हा व्यक्ती नेमका कोण याचा शोध त्या अधिकाºयाकडून घेतला जात असल्याचेही समजते.