महसूल कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता कायम राहणार
By Admin | Updated: July 6, 2015 02:39 IST2015-07-06T02:39:04+5:302015-07-06T02:39:04+5:30
महसूल विभागाच्या काही संर्वगातील कर्मचाऱ्यांना पहिल्या पदोन्नतीसाठी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

महसूल कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता कायम राहणार
यवतमाळ : महसूल विभागाच्या काही संर्वगातील कर्मचाऱ्यांना पहिल्या पदोन्नतीसाठी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. पुढील पदोन्नतीसाठी परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून सेवा जेष्ठता पकडल्या जात होती. याबाबत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे निकष लावल्या जात होते. यात सुसुत्रता आणण्यासोबतच संपूर्ण राज्यात सेवा जेष्ठतेसाठी एकच निकष लावण्याच्या अनुषंगाने सदर कर्मचारी ज्या दिवशी शासन सेवेत रुजु झाला असतील त्या दिनांकापासून त्याची सेवा जेष्ठता ग्राह्य धरण्यात येणार आहे.
सेवा जेष्ठतेबाबत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे निकष लावल्या जात होते. काही जिल्ह्याच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा रुजु दिनांक सेवा जेष्ठतेसाठी ग्राह्य धरण्यात येत होता. तर काही ठिकाणी विभागाची परिक्षा पास झाल्याच्या दिनांकापासून सेवा जेष्ठता धरली जात होती. त्यामुळे पुढील पदोन्नतीसाठी मोठी अडचण काही कर्मचाऱ्यांना निर्माण
होत होती.
काही कर्मचारी पहिल्या, दुसऱ्या प्रयत्नातच परीक्षा पास झाल्याने त्यांचा सेवाकाळ कमी असतांनाही त्यांना सेवा जेष्ठ ग्राह्य धरल्या जात होते. तर काही कर्मचारी अनेक वर्षांपासून कार्यरत असतांना केवळ परीक्षा उशीराने उत्तीर्ण झाल्याने त्यांचा सेवा ज्येष्ठताकाळ उशिराने ग्राह्य धरण्यात येत होता. त्यामुळे पुढील पदोन्नती देतांना कमी सेवाकाळ असणाऱ्यांना आधी तर जास्त सेवाकाळ असणाऱ्यांना उशीरा पदोन्नती दिली जात होती. काही जिल्ह्यात परीक्षा निकष न लावता कर्मचाऱ्याचा रुजु दिनांक सेवा जेष्ठतेसाठी ग्राह्य धरुन पदोन्नती देण्यात येत होती. यामुळे कालबध्द पदोन्नतीतही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे निकष लावून कार्यवाही केली जात होती.
यामुळे अनेकदा न्यायालयीन प्रकरणेही उद्भवत होती. तसेच सेवा जेष्ठता ठरवितांना शासनास अडचण जात होती. याबाबी लक्षात घेता महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी नियमावलीत सुधारणा करून रुजु दिनांकापासून सेवा जेष्ठता धरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लिपीक, अव्वल कारकून या पदांना पदोन्नती व पुढील सेवा जेष्ठता ठरवितांना सुसुत्रता येण्यासोबतच कालबध्द पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढण्यास मदत होणार आहे. सेवा जेष्ठता ठरविण्यासंदर्भात मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्रायही मागविण्यात आले होते. त्यांनीही याबाबत अनुकुलता दर्शविल्याने नियमावलीत सुधारणा करण्यात आली आहे.अव्वल कारकून या पदासाठी २१ जून १९८२ हा दिनांक विचारात घेवून जेष्ठता याद्या सुधारीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. प्रक्रियेतील सुधारणेचा सकारात्मक
परिणाम दिसणार आहे.
(कार्यालय प्रतिनिधी)